Monday, April 13, 2026

Mukhyamantri Sahayata Nidhi : रुग्णांसाठी मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेत लवकरच होणार 'हे' बदल

Mukhyamantri Sahayata Nidhi : रुग्णांसाठी मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेत लवकरच होणार 'हे' बदल

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासाठी आता ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या नवीन प्रणालीमुळे वैद्यकीय मदतीसाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया अवघ्या ८ तासांत पूर्ण होणार असून, लवकरच रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

नव्या व्यवस्थेनुसार रुग्णाला स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज राहणार नाही. संबंधित रुग्णालयच रुग्णाची कागदपत्रे तपासून अर्ज थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे पाठवणार आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे. तसेच, रुग्णालयात आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया प्रशासनाच्या माध्यमातून पार पडणार असल्यानं रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळ कमी होईल.

या नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया वेगवान होणार असून सर्व कागदपत्रे पूर्ण आणि नियमांनुसार असल्यास केवळ ८ तासांत मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना तातडीनं आर्थिक मदत मिळून उपचारांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मदत कक्षामध्ये रुग्णस्नेही बदल करण्यात आले असून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि विलंब टाळता येईल. रुग्णालय प्रशासन, मदत कक्ष आणि शासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होणार असल्यानं सेवा अधिक सक्षम होईल.

गेल्या आर्थिक वर्षात राज्यातील ४० हजार ७७६ रुग्णांना एकूण ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली असून या आकडेवारीवरून या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत असल्याचं स्पष्ट होतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ही प्रणाली संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी नागरिकांना १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

या ऑनलाईन प्रणालीमुळे वैद्यकीय मदत मिळवण्याची प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होणार असून यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळून त्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा