Saturday, April 11, 2026

या हट्टी आणि आळशी टीनएजर्सचे करायचं काय?

या हट्टी आणि आळशी टीनएजर्सचे करायचं काय?

आनंदी पालकत्व - डाॅ. स्वाती गानू

आजकाल अनेक पालकांची तक्रार असते, की त्यांची किशोरवयीन मुलं आळशी झाली आहेत, मोबाईलवर वेळ घालवतात, घरकाम करत नाहीत आणि जबाबदारी घेत नाहीत. पण प्रत्येक वेळी मुलांना “आळशी” म्हणणं योग्य नसतं. त्यांच्या वागण्यामागे काही खोलवर रुजलेली कारणं असू शकतात, ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. मुलं जेव्हा हट्टीपणा करतात, आळशीपणा करतात त्यावेळेला खरं म्हणजे आपल्या मनात स्वसंवादाची अर्थात सेल्फ टॉकची कॅसेट चालू असते. मानसशास्त्र बाजूला ठेवावे आणि दोन धपाटे घालावे किंवा शाब्दिक वाद करावा असं वाटत असतं; परंतु आपल्या हट्टीपणाने आणि माझं ऐकत नाही म्हणजे काय या रागाने प्रश्न अधिकाधिक चिघळत जातात म्हणून खालील पद्धतीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही.

- किशोरवयीन मुलं दिवसभर खूप गोष्टींमध्ये व्यस्त असतात - शाळा, क्लासेस, खेळ, मित्र, इतर उपक्रम. त्यामुळे घरी आल्यावर ते थकलेले असतात. त्याशिवाय त्यांच्या मेंदूचा विकास अजून पूर्ण झालेला नसतो, त्यामुळे वेळेचं नियोजन, लक्ष देणं आणि निर्णय घेणं त्यांना कठीण जातं. अभ्यासाचा ताण, परीक्षांचा दबाव आणि भविष्यासंबंधी चिंता यामुळेही ते थकून जातात किंवा काहीच करायची इच्छा राहत नाही. - मोबाईल, सोशल मीडिया यामुळे झोप कमी होते आणि त्यामुळे ऊर्जा कमी वाटते. तसेच प्युबर्टीमुळे शरीरात आणि मनात मोठे बदल होतात. मित्रांचा प्रभावही खूप महत्त्वाचा असतो - ते जे करतात, तेच करण्याची मुलांची प्रवृत्ती असते. - कधी कधी “आळशीपणा” हा खरं तर आळशीपणा नसतोच. तो चिंता (anxiety), नैराश्य (depression) किंवा इतर मानसिक समस्यांचा संकेत असू शकतो. जर मुलाच्या वागण्यात अचानक बदल दिसला - जसं की आधी खूप अॅक्टीव्ह असलेलं मूल अचानक शांत झालं - तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मुलांना “आळशी” असा शिक्का मारणं टाळायला हवं, कारण त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. - पालकांसाठी सर्वात मोठं आव्हान म्हणजे, अशा परिस्थितीत शांतपणे आणि समजून घेऊन प्रतिक्रिया देणं. उदाहरणार्थ, मुलं सोफ्यावर बसून खायला आणायला सांगतात तेव्हा आपल्याला राग येतो. पण रागावण्याऐवजी शांतपणे “तू स्वतः घेऊन खाऊ शकतोस” असं सांगणं योग्य ठरतं. - मुलं मोबाईलमध्ये गुंतून तुमचं बोलणं ऐकत नाहीत, तेव्हा ओरडण्याऐवजी “फोन थोडा वेळ बाजूला ठेव” असं सांगणं अधिक परिणामकारक असतं. - त्यांच्या खोलीचा पसारा पाहून लगेच रागावण्याऐवजी त्यांना थोडी मदत करून सुरुवात करायला प्रोत्साहित करणं उपयोगी ठरतं. -घरात पसारा करून झोपल्यावर त्यांना शिक्षा देण्याऐवजी “हे साफ केल्याशिवाय बाहेर जायचं नाही” असा नियम ठेवता येतो. यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव होते. - काही मुलं दिवसभर त्यांच्या खोलीत राहतात. अशावेळी त्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्याऐवजी, “आराम कर, पण काहीतरी वेगळंही कर” असं सांगणं चांगलं. जसं की चालायला जाणं, काहीतरी क्रिएटीव्ह करणं किंवा व्यायाम करणं. - अभ्यासाच्या बाबतीत, मुलं काम करत नाहीत तेव्हा त्यांना “हे तुझं काम आहे” असं ओरडण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे. त्यांना विषय कठीण वाटतोय का, शिक्षक आवडतो का किंवा मदतीची गरज आहे का हे विचारणं गरजेचं आहे. - कधी कधी मुलं काम अर्धवट करतात. अशावेळी त्यांना दोष देण्याऐवजी त्यांनी काय चुकवलं ते दाखवून पूर्ण करायला सांगावं. यामुळे त्यांना काम नीट करण्याची सवय लागते. - काही वेळा मुलं पालकांवर ओरडतात किंवा घाई करायला सांगतात. अशावेळी शांत राहून “ओरडून काही उपयोग नाही” असं सांगणं योग्य आहे.

शेवटी, किशोरवयीन मुलांचं असं वागणं तात्पुरतं असतं. या काळात त्यांना समजून घेणं, त्यांच्याशी संवाद ठेवणं आणि संयमानं वागणं खूप महत्त्वाचं आहे. ही वेळ त्यांना शिकवण्याची आणि त्यांच्याशी नातं मजबूत करण्याची असते. थोडक्यात, मुलांना दोष देण्याऐवजी त्यांच्या भावना समजून घेतल्या तर पालक आणि मुलांचं नातं अधिक चांगलं होऊ शकतं. मुलं पंधरा-सोळा वर्षांची आहेत म्हणून आपण त्यांच्या वयाचे होऊन जर तसेच वागू लागलो, तर अशा परिस्थितींना हाताळणे कठीण होऊन बसते. याकरिताच आपल्याला काही गोष्टी ठामपणे सांगाव्या लागतील. प्रसंग हाताळावे लागतील म्हणजे काही वर्षांपुरते येणारे हे वादळ आपल्याला शांत करता येते.

Comments
Add Comment