Saturday, April 11, 2026

नारळीकरांचे बु‌द्धिवैभवी जग

नारळीकरांचे बु‌द्धिवैभवी जग

नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड

मी टीव्हीवर मुलाखती घेत होते, तो काळ मजसाठी बुद्धिवैभवी होता. अत्यंत आनंदाचा होता. त्या काळात आबा देशपांडे यांनी माझ्याकडून चांगले काम करवून घेतले. अतिशय चांगली माणसे मला भेटवली. वास्तविक मी शालेय चित्रवाणीची निवेदिका होते. आणि श्रीमती नीना राऊत यांचेकडे काम करीत असे. “ज्ञानदीप हा एक शैक्षणिक कार्यक्रम आहे, विजयाताई.” इति आबा. “मला त्याची पूर्ण कल्पना आहे आबा.” “मग माझ्याकडे पण आपण कार्यक्रम करू शकता.” “आनंदाने.” मी खरोखरीच प्रसन्नतेने म्हणाले. त्यावेळी मी डॉ. पारसनीस यांच्याकडे नुकतीच पीएच.डी. करीत होते. मी ‘रेडिओ आणि टीव्हीचे शालेय शिक्षणातील स्थान’ या विषयावर पीएच.डी. करीत होते. माझ्याबरोबर सुधाकर केसरकर सर (माझे उदयाचल हायस्कूल, गोदरेज, विक्रोळी) या नोकरीच्या ठिकाणातले माझे सहकारी, वेगळ्या विषयावर पीएच.डी. करीत होते. त्यांचा विषय होता ‘थ्री लेंग्वेज फॉर्म्युला. त्यांना पीएच.डी. मिळून गेली.

माझी पीएच.डी. रखडली होती. एका प्रशिक्षकाने माझ्या थिसीसला नकार कळविला होता; त्यामुळे ती पीएच.डी. रखडली होती. आता ती तिसऱ्या परीक्षकाकडे गेली होती. मी आणि माझ्या दोघी, प्राजक्ता, निशिगंधा या मुली सारखी प्रार्थना करीत होत्या की, या परीक्षकांना तरी माझा प्रबंध आवडू दे नि तो एकदाचा आवडला! नशीब माझे!

त्या काळात आबांनी मला खूप चांगली माणसे भेटवली. त्यातलेच एक नाव म्हणजे ताई आणि विष्णूपंत नारळीकर. पुण्यातील त्यांच्या घरी प्रेमाने स्वागत होई. विष्णूपंत एवढे विद्वान गृहस्थ, पण गर्व काडीचा नाही. एकदा मंगलाताई राजवाडे मला कुलाबा येथे वाचनालयात भेटल्या. मला त्या (मैत्रीचे पर्व गच्च झाल्यावर) म्हणाल्या, “मी सुधा मंगला राजवाडे होते. तेव्हा एम्. एस्स. पहिल्या वर्गात पहिली आले होते. पण नारळीकर यांच्या घरात जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ असल्याने, माझे यश तोकडे पडते.”

एकदा मी ताईना ते गप्पांच्या ओघात सांगितले. ‘मंगलाताई वि‌द्यापीठातल्या नामवंत बुद्धिमंत आहेत. म्हणजे होत्या.’ “म्हणून तर माग्लाला आम्ही आग्रहाने या घरी घेऊन आलो. “सुमतीताई नारळीकर म्हणाल्या. “खरं सांगू का? मी सुद्धा विद्यापीठात पहिली आले होते. पोस्ट ग्रॅज्युएशन करताना.” मी चाटच पडले. “म्हणून हिला वरली.” नारळीकर सरांचे बोल ऐकले. अर्थात विष्णूपंत नारळीकर यांचे बोल ! संतती हुशारच व्हावी ही योजना ! त्यांची योजना यशस्वी झाली. पूर्ण यशस्वी ! जयंत आणि अनंत ही दोन्ही अपत्ये अत्यंत हुशार निपजली.

“मी त्यांना कधी मारले नाही.” ताई म्हणाल्या “जयंत आणि अनंत लहान असताना कधी भांडले तर मी स्वतः आतल्या खोलीत निघून जायची नि दार आतून लावून घ्यायची.” “आणि मुलं नि विष्णूपंत बाहेर?” “हो.” त्यांनी उत्तर दिले. “मुलांची भांडणे मग थोड्या वेळात मिटून जात.” त्या पुढे म्हणाल्या. “मग त्यांना आईची आठवण यायची. मग ती दारापाशी येऊन कडी वाजवत. ताई, आता आम्ही भांडणार नाही. तू बाहेर यायचं काय घेशील? असं वचन देत.” ही छान युक्ती आहे असं वाटून मी ही निश्चय केला, की मुलींना कधीही हात उगारायचा नाही. एकदा विजया जोगळेकर-धुमाळे यांना मी म्हटले की, मी माझ्या मुर्तीवर कधी हात उगारत नाही. त्यावर माझी मोठी मुलगी पटकन् म्हणाली, पण इतकी बोलायचीस की, त्यापेक्षा एखादी चापटी परवडली.” विजयाबाईसमोर ! मला कुठे बघावे समजेना झाले. असो, तर नारळीकरांच्या मुलाखती संदर्भात बोलत होतो आपण. एवढा मोठा जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ ! पण ते फाटकापाशी उभे होते. माझ्या स्वागतासाठी. मी या स्वागताची कल्पनाच केली नव्हती; त्यामुळे चकितच झाले. “ मी जयंत नारळीकर.” “अहो, तुम्हांला कोण ओळखत नाही?” “शास्त्रज्ञ म्हणून नाव झाले असले, तरी आताच्या पिढीला संशोधनात रस नाही. त्यांना सिनेकलाकार, नाट्यचित्र सृष्टीतली माणसे यांच्यात रस आहे.” ते खूप खरे बोलत होते. मुद्द्याचे बोलत होते. एक दिवस कळले की, नारळीकर साहेब गेले. त्यांनी झोपेतच विराम घेतला. एक बुद्धिमंत जीव मातीत विसावला. मलाही एक दिवस जायचेच आहे. कोणीच अमर नाही या जगात !

Comments
Add Comment