Saturday, April 11, 2026

“रहें न रहें हम, महका करेंगे...”

“रहें न रहें हम, महका करेंगे...”

स्मृतीपटल - अनिल रा. तोरणे

'मदत’ हा शब्द ऐकताना जितका चांगला वाटतो तितका तो दुसऱ्याला मदत करताना वाटत नाही; परंतु जगात असेही अनेक लोक आहेत जे दुसऱ्याची निकड जाणून घेऊन आपल्या पद्धतीने ऐन गरजेच्या वेळी त्याच्या मदतीला उभे राहतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील साम्यवादी (कम्युनिस्ट) विचारसरणीचे एक गीतकार कारावासात असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली होती. ते पाहून एका प्रख्यात अभिनेत्याने त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने हात पुढे केला. ते अभिनेते निर्माता-दिग्दर्शकही होते. त्यांनी आपल्या चित्रपटासाठी त्या गीतकाराकडून गीत लिहून घेतले खरे; परंतु त्या चित्रपटाची काही रूपरेषाही त्यावेळी तयार नव्हती ! मात्र अनेक वर्षांनंतर त्या गीताचा त्यांनी आपल्या एका चित्रपटात वापर केला.

उत्तर प्रदेश राज्याच्या सुलतानपूर जिल्ह्यातील कुडवार ब्लॉक भागातील गंजेहडी या गावात १ ऑक्टोबर, १९१९ या दिवशी असरार उल हसन खान ऊर्फ मजरूह सुलतानपुरी यांचा जन्म झाला. मजरूह यांना इंग्रजी भाषेचा तिटकारा होता. त्यांचे वडील पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल होते. मजरूह यांनी हकीम बनावे म्हणून वडिलांनी त्यांना उर्दू, फारसी आणि अरबी भाषांचे शिक्षण दिले. लखनऊच्या राजकीय तकमील उततिब महाविद्यालयातून मजरूह हकिमी शिकले आणि त्यांनी सुलतानपूरमध्ये उणीपुरी नऊ वर्षे हकीम म्हणून काम केले; पण त्यांच्या प्राक्तनात काही वेगळेच लिहिलेले होते !

१९४५ साली मजरूह सुलतानपुरी एका मुशायऱ्यात भाग घेण्यासाठी मुंबईला आले. हा मुशायरा ‘साबू सिद्दिकी हॉल’मध्ये होणार होता. या मुशायऱ्यात त्यांनी “शब-ए-इंतजार की कश्मकश में न पूंछ कैसे सहर हुई, कभी एक चराग जला दिया कभी एक चराग बुझा दिया...” हा शेर सादर करून एकच धमाल उडवून दिली ! मुशायऱ्याला उपस्थित असलेले चित्रपट निर्माते ए. आर. कारदार यांनी जागच्या जागी मजरूह सुलतानपुरी यांना आपल्या चित्रपटाची गीते लिहावयास देण्याची तयारी दर्शविली; परंतु मजरूह यांनी त्यांना चक्क नकार दिला! मजरूह सुलतानपुरी जिगर मुरादाबादी यांचे शिष्य होते. म्हणून मुरादाबादी यांच्याकडे कारदार गेले. मुरादाबादी यांनी मजरूह यांना समजावून सांगितल्यावर ते चित्रपटगीते लिहिण्यासाठी तयार झाले. कारदार यांच्या सूचनेनुसार संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी एक चाल तयार करून मजरूह यांना त्यावर एक गीत लिहावयास सांगितले. मजरूह यांनी त्याबरहुकूम पहिल्या ओळी लिहिल्या...” जब उसने गेसू बिखराए, बादल आए झूमके...” ! नौशाद यांना ते गीत इतके आवडले की ताबडतोब मजरूह सुलतानपुरी यांना `शाहजहान` या चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी करारबद्ध करण्यात आले.

`शाहजहान` चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेली गीते अतिशय लोकप्रिय झाली. संगीतकार नौशाद यांच्या सुरांनी सजलेले आणि कुंदन लाल (के.एल.) सहगल यांनी गायिलेले व त्यांच्यावरच चित्रित झालेले “जब दिल ही टूट गया, हम जी के क्या करेंगे....” हे गीत सहगल यांना अतिशय प्रिय होते. त्यांनी चक्क आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले होते, की माझ्या मृत्यूनंतर माझ्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघून स्मशानात माझ्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होईपर्यंत हे गीत एकदाच नव्हे तर वारंवार ऐकविले जावे आणि सहगल यांच्या निधनानंतर हे गीत ग्रामोफोनवर एकदा नव्हे तर अनेकदा वाजविले गेले! `दस्तक` या चित्रपटातील “हम हैं मता-ए-कूचा ओ बाजार की तरह, उठती है हर निगाह खरीदार की तरह....” हे संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांनी स्वरबद्ध केलेले आणि लता मंगेशकर यांनी गायिलेले लोकप्रिय गीत मजरूह यांनी लिहिले होते. त्यांना आपण मुस्लीम असण्यापेक्षा रजपूत असल्याचा सार्थ अभिमान होता. आमचे पूर्वज रजपूत होते असे ते अभिमानाने सांगत. मजरूह यांनी लेनिन आणि मार्क्स यांचे वाड्.मय वाचलेले होते. ते साम्यवादी विचारसरणीचे होते. त्यांनी लिहिलेल्या एका कवितेमुळे त्यांच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी ओढविली होती. कारावास भोगत असतानाही ते गप्प बसले नव्हते. कैदेतील एका ख्रिस्ती धर्मगुरूकडून ते इंग्रजी शिकले. शिवाय त्यांचे गीतलेखनही चालूच होते.

मजरूह कारावासात होते आणि त्यांची आर्थिक पंरिस्थिती खालावत चालली होती. हे पाहून अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक राज कपूर त्यांच्या सहाय्यार्थ पुढे आले आणि त्यांनी मजरूह यांना आपल्या एका चित्रपटासाठी एक गीत लिहिण्याची विनंती केली. मजरूह यांनी राज कपूर यांच्या सांगण्यानुसार गीत लिहिलेही; परंतु त्यावेळी त्या चित्रपटाची ना रूपरेषा तयार होती ना तो चित्रपट कधी निर्माण होण्याची शाश्वती होती! मजरूह सुलतानपुरी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी त्या गीताबद्दल राज कपूर यांनी मजरूह यांच्या हातात १ हजार रुपये ठेवले! आपल्या प्रतिकूल परिस्थितीत राज कपूर यांनी केलेली ही मदत मजरूह आयुष्यभर विसरले नाहीत! काही काळानंतर राज कपूर यांनी त्या गीताचा आपल्या एका चित्रपटात समावेश केला.

`राजश्री पिक्चर्स`निर्मित `दोस्ती` या चित्रपटासाठी केलेल्या गीतलेखनाबद्दल मजरूह सुलतानपुरी यांना सर्वोत्कृष्ट गीतलेखनाचे पहिले `फिल्मफेअर पारितोषिक` मिळाले. १९९३ साली त्यांना सर्वोच्च `दादासाहेब फाळके पुरस्कारा`ने गौरविण्यात आले. चालीवर गीत लिहिण्याची कला मजरूह यांना चांगलीच अवगत होती आणि चित्रपटसृष्टीत असा कल त्यांनीच आणला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. `दोस्ती`, `ममता`, `पाकीजा` `दस्तक` या आणि अन्य अनेक चित्रपटांची गीते मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिली. त्यांनी एक शेर लिहिला होता : “मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया...!” १९४६ सालापासून निघालेला त्यांचा हा तांडा (कारवां) २००० साली थांबला ! २४ मे, २००० या दिवशी वयाच्या ८० व्या वर्षी मजरूह सुलतानपुरी यांचे मुंबईत निधन झाले.

मजरूह सुलतानपुरी आज इहलोकात नसले तरी `ममता` या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेल्या, संगीत दिग्दर्शक रोशन यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि लता मंगेशकर यांनी गायिलेल्या “रहें न रहें हम महका करेंगे बन के कली बन के सबा बाग-ए-वफा में....” या सदाबहार गीताप्रमाणेच ते आपल्या हृदयात सतत सुगंध निर्माण करीत राहतील.

Comments
Add Comment