उत्तर व दक्षिण गोलार्ध

विज्ञानकथा - प्रा. देवबा पाटील


शिवम व त्याचे मित्र सहलीला गेले असताना चर्चा करत होते.“आपली पृथ्वीही फिरते वाटते?” कुणालनेशंका विचारली.“अर्थातच. आपली पृथ्वीसुद्धा स्वत:भोवती सतत फिरत असते व त्याचवेळी ती सूर्याभोवतीसुद्धा सदैव फिरत असते; परंतु पृथ्वीचा अक्ष तंतोतंत सरळ उभा नसून साडेतेवीस अंशातून कललेला आहे. त्यामुळे ती फिरतांना एकदम तंतोतंत उभ्या स्थितीत नसून उभी पण तिच्या उभ्या अक्षाशी किंचितशी कलती होऊन म्हणजे थोडीशी तिरपी होऊन फिरत असते.”“बरं मग पृथ्वीच्या एकूण किती गती आहेत?”अमोलने प्रश्न केला. “पृथ्वीच्या दोनच गती आहेत. एक गती म्हणजे ती स्वत:च्या अक्षाभोवती फिरते ती गती व दुसरी गती म्हणजे ती सूर्याभोवती एका ठरावीक कक्षेत फिरते ती गती.” शिवमने उत्तर दिले.


“अक्ष? अक्षाशी? अक्षाभोवती? म्हणजे पृथ्वीचा अक्ष कोणता आहे मग?” कौशलने प्रश्न विचारला.
शिवम् म्हणाला, “पृथ्वीच्या वरच्या टोकाला म्हणजे उत्तरेकडील टोकाला उत्तर ध्रुव व खालच्या टोकाला म्हणजे दक्षिणेकडील टोकाला दक्षिण ध्रुव म्हणतात. या ध्रुवाजवळील प्रदेशांना उत्तर व दक्षिण ध्रुव प्रदेश असे म्हणतात. ह्यांना पृथ्वीचे भौगोलिक ध्रुव म्हणतात. ह्या दोन ध्रुवांना जोडणा­ऱ्या व पृथ्वीच्या मध्यभागातून जाणा­ऱ्या काल्पनिक रेषेला पृथ्वीचा अक्ष म्हणतात.”


“पृथ्वीचे विषुववृत्त, अक्षवृत्त व रेखावृत्त म्हणजे काय असते?” विपुलने विचारले.
“पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध (गोलार्ध म्हणजे अर्धा गोल भाग) विभाजित करणा­ऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आडव्या वर्तुळाला पृथ्वीचे विषुववृत्त म्हणतात. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिण ह्या दोन्ही बाजूस मोजलेल्या अंंशात्मक अंतरांना अक्षांश म्हणतात. ते ज्या आडव्या रेषांनी दाखवतात त्यांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणा­ऱ्या पृथ्वीच्या पाठीवरील उभ्या रेषांना रेखावृत्ते म्हणतात. ग्रीनीचमधून जाणा­ऱ्या रेखावृत्तास शून्य रेखावृत्त किंवा प्रारंभिक रेखावृत्त म्हणतात. रेखावृत्ताच्या पूर्वपश्चिमेला मोजलेले जे अंशात्मक अंतर असते त्याला रेखांश म्हणतात. विषुववृत्तापासून उत्तरेकडे एका विशिष्ट अंतरावर म्हणजे सुमारे साडेतेवीस अंशावर असलेल्या अक्षवृत्तास कर्कवृत्त म्हणतात. तसेच विषुववृत्तापासून दक्षिणेकडे कर्कवृत्ताएवढ्याच एका ठरावीक अंतरावर म्हणजे सुमारे साडेतेवीस अंशावर असलेल्या अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात. जसे विषुववृतामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग होतात तसेच शून्य रेखावृत्तामुळे पृथ्वीचे पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध असे दोन भाग होतात.” शिवमने सांगितले.


“अरे यार, सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे म्हणतात. पण हे गुरुत्वाकर्षण म्हणजे नक्की काय असते रे शिवम्?” कपिलने विचारले.
“कोणत्याही दोन वस्तूंमध्ये, वस्तूकणांत, दोन खगोलांत एक विशिष्ट प्रकारचे आकर्षण असते त्याला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात.” शिवम् सांगत असतांनाच “ही गोष्ट आयझॅक न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढली.” कैवल्य मध्येच बोलला.
“खरे आहे ते” शिवमने सांगितले.


“झाडाचे सफरचंद झाडावरून खाली पडतांना बघून न्यूटनला हा शोध लागला असे मीही वाचले आहे.” अमोलनेही त्यात पुस्ती जोडली.
“बरोब्बर आहे.” शिवम् पुढे सांगू लागला, “गुरुत्वाकर्षण हे त्या दोन खगोलांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात तर त्यांच्या वस्तूमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात असते. म्हणजे अंतर कमी तर गुरुत्वाकर्षण जास्त; परंतु वस्तूमान जास्त असेल तर गुरुत्वाकर्षणही जास्तच असते. जास्त वस्तुमानाचा ग्रह वा तारा कमी वस्तुमानाच्या ग्रहाला आपल्या आकर्षणात गुंतवून ठेवतो. प्रत्येक ग्रह ता­ऱ्याला गुरुत्वाकर्षण असते. ह्या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणानेच कोणती वर फेकलेली वस्तू पृथ्वीवर परत येते.”

Comments
Add Comment

प्रेरणाच महत्त्वाची...

गोष्ट लहान, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात यश, प्रगती आणि समाधान मिळवण्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात;

गॅस दुरुस्ती आणि मी

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ रोघरी गॅस शेगडी आहे. आपल्याला नेहमीच एक अनुभव येत असेल जो मलाही नेहमी येतो तो मी

अस्वलाचं बाळ

कथा - रमेश तांबे सूर्य उगवला आणि त्याची प्रकाश किरणे साऱ्या जंगलात पसरली. सारं जंगल उजळून निघालं. झाडे-झुडपे, वेली

क्वाँटम कॉम्पुटर्स : विज्ञानाची गरुडझेप

तंत्रज्ञान - प्रा. प्रवीण पांडे सध्याचे युग हे विज्ञान आणी तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात अत्यंत

इतरांना योग्य मार्गाला लावा

गोष्ट लहान, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर समाजात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या विचारांची, स्वभावाची आणि अनुभवांची

काचेपलीकडचे जग

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ शारीरिक प्रकृती उत्तम असूनही माणूस कधीकधी मनाने खचतो म्हणजे शरीरापेक्षा मन ही