गोष्ट लहान, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर
मानवी जीवनात यश, प्रगती आणि समाधान मिळवण्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात; परंतु त्यामध्ये प्रेरणा हा सर्वात मूलभूत आणि प्रभावी घटक आहे. प्रेरणा ही अशी शक्ती आहे जी माणसाला कृती करण्यास, अडचणींवर मात करण्यास आणि आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करण्यास प्रवृत्त करते. प्रेरणा म्हणजे फक्त उत्साह नाही, तर ती एक अंतर्गत ज्वाला आहे. ही ज्वाला व्यक्तीला “मी करू शकतो” हा आत्मविश्वास देते. जेव्हा माणूस प्रेरित असतो, तेव्हा तो अपयशाला घाबरत नाही, उलट त्यातून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रेरणा ही यशाची पहिली पायरी मानली जाते.
विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रेरणेचे विशेष महत्त्व आहे. योग्य प्रेरणा मिळाल्यास विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकासातही पुढे जातात. शिक्षक आणि पालक यांची भूमिका येथे अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यांच्या सकारात्मक शब्दांनी, योग्य मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनाने विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो.
प्रेरणा दोन प्रकारची असते – बाह्य आणि अंतर्गत. बाह्य प्रेरणा म्हणजे बक्षीस, कौतुक किंवा शिक्षा यामुळे मिळणारी प्रेरणा; परंतु अंतर्गत प्रेरणा अधिक प्रभावी असते, कारण ती स्वतःच्या इच्छेतून आणि ध्येयातून निर्माण होते. जो व्यक्ती अंतःप्रेरणेने काम करतो, तो कोणत्याही परिस्थितीत थांबत नाही.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नाही; त्याला प्रेरणेची जोड आवश्यक आहे. अनेक वेळा कमी साधनसंपत्ती असूनही काही लोक मोठे यश मिळवतात, कारण त्यांच्याकडे प्रबळ प्रेरणा असते. याउलट, सर्व सुविधा असूनही प्रेरणेचा अभाव असेल तर प्रगती होणे कठीण जाते. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःला प्रेरित ठेवण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार, योग्य ध्येय निश्चिती, चांगल्या व्यक्तींचे सहकार्य आणि सतत शिकण्याची वृत्ती यामुळे प्रेरणा टिकून राहते.
यश मिळवण्यासाठी कौशल्य, ज्ञान आणि संधी यांच्याइतकीच - किंबहुना त्याहून अधिक - प्रेरणाच महत्त्वाची असते. महंते महंत करावे । युक्तिबुद्धीने भरावे। जाणते करुनि विखरावे । नाना देशी ॥ – दासबोध
समाजाच्या हितासाठी अथवा लोककल्याणासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे, अशा माणसाला समर्थ महंत असे म्हणतात. त्या काळी समर्थांनी असे अनेक महंत तयार केले. हे महंत भारतभर पायी प्रवास करत. गावागावांत मठ स्थापन करत. महंत व्याख्यानातून आणि साहित्यातून प्रचाराचे कार्य करत. महंत येणाऱ्या विद्यार्थ्यांवर नैतिक शिक्षणांचे चांगले संस्कार करत. त्यांच्याकडे चांगली पुस्तके, बोधकथा व ग्रंथ असत. त्यांना वेगवेगळ्या महापुरुषांच्या कथा सांगितल्या जात. अशा महंतांमध्ये स्त्रियांचाही समावेश असे. अक्कामहादेवी, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, दिवाकर गोसावी हे त्या काळातील महंत प्रसिद्ध होते. या सर्वांनी भारतभर धर्मप्रसाराचे कार्य केले. आपल्यासारखे अनेक महंत तयार केले.
स्वामी विवेकानंद अमेरिकेतून परतल्यानंतर भारतात जागोजागी व्याख्यानातून धर्मप्रसार करत होते. लाहोर येथील एका महाविद्यालयात स्वामीजींचे व्याख्यान होते. प्राध्यापक तीर्थराम गोस्वामी मोठ्या एकाग्र चित्ताने स्वामीजींचे व्याख्यान ऐकत होते. त्यांच्या मनावर स्वामीजींच्या जीवनाचा आणि विचारांचा खोलवर परिणाम झाला. प्राध्यापक गोस्वामी चांगले सधन होते. त्यांच्या हातातील घड्याळाला सोन्याचा पट्टा होता. त्यांनी स्वामीजींच्या कार्याला मदत म्हणून ते सोन्याचे घड्याळ स्वामीजींना देऊ केले. स्वामी विवेकानंदांनी एकदा त्या घड्याळाकडे पाहिले. ते सोन्याचे आहे हे त्यांच्या लक्षात आले; परंतु स्वामीजी हे निशकांचन संन्यासी होते. सोने आणि माती त्यांच्या दृष्टीने समान होते. त्यांनी प्राध्यापक गोस्वामी यांना सांगितले, “मित्रा, हे घड्याळ मी स्वीकारले आहे; परंतु मी ते या खिशाद्वारे वापरीन.”
असे म्हणत स्वामीजींनी ते घड्याळ परत त्यांच्या खिशात ठेवले. या घटनेचा गोस्वामींवर चांगलाच परिणाम झाला. स्वामीजींपासून प्रेरणा घेऊन त्यांनी संसार सोडला. ते पुढे रामतीर्थ झाले. स्वामी विवेकानंदांच्या प्रभावाने त्यांनी जगभर प्रवास केला आणि आपल्या धर्मातील उदात्त जीवनमूल्ये सर्वत्र पसरविली. हेच काम समर्थांनी आपल्या काळात केले. त्यातून अनेक महंत तयार केले. हे सारे महंत नि:स्पृह होते. समर्थांची त्यांना शिकवण होती –आमुची प्रतिज्ञा ऐसी । काही न मागावे शिष्यांसी ।आपणामागे जगदीशासी । भजत जावे ॥






