Sunday, April 12, 2026

IPL 2026 CSK vs DC : अखेर चेन्नईच्या विजयाचा श्रीगणेशा झालाच! संजू सॅमसन ठरला या हंगामातील पहिला शतकवीर

IPL 2026 CSK vs DC : अखेर चेन्नईच्या विजयाचा श्रीगणेशा झालाच! संजू सॅमसन ठरला या हंगामातील पहिला शतकवीर

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ मधील १८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने अखेर विजयाचा दुष्काळ संपवला. सलग तीन पराभवांनंतर सावरत, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सचा २३ धावांनी पराभव करत स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं. या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन, ज्याने आपल्या वादळी फलंदाजीने दिल्लीच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.

संजू सॅमसनची खेळी या सामन्याची खासियत ठरली. त्याने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेत केवळ २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याची फटकेबाजी कायम राहिली आणि ५२ चेंडूत १४ चौकार व ३ षटकारांसह त्याने शतक झळकावले. आयपीएल २०२६ मधील हे पहिले शतक ठरले असून, सॅमसनच्या कारकिर्दीतील हे सर्वात वेगवान शतक आहे. अखेरीस त्याने ५६ चेंडूत ११५ धावा करत २०५.३५ चा शानदार स्ट्राइक रेट नोंदवला.

याआधी सीएसकेला आरसीबी, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र या सामन्यात त्यांनी २० षटकांत २ गडी गमावत तब्बल २१२ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला १८९ धावांपर्यंतच मजल मारता आली. ट्रिस्टन स्टब्सने ६० धावांची झुंजार खेळी केली, पण ती अपुरी ठरली. या विजयासह सीएसकेने गुणतालिकेत १०व्या स्थानावरून ९व्या स्थानावर झेप घेत दोन गुणांची कमाई केली.

सॅमसनला आयुष म्हात्रेची चांगली साथ मिळाली. म्हात्रेने ३६ चेंडूत ५९ धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली, तर शेवटी शिवम दुबेने १० चेंडूत २० धावांची झंझावाती खेळी करत संघाचा स्कोर २०० पार नेला. गायकवाड मात्र १५ धावांवर बाद झाला. दिल्लीकडून कर्णधार अक्षर पटेलने एकमेव विकेट घेतली.

२१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने दमदार सुरुवात केली. पाथुम निसांकाने २४ चेंडूत ४१ धावा केल्या, तर के.एल. राहुलने १८ धावांचे योगदान दिले. मात्र मधल्या फळीतील अपयशामुळे दिल्लीचा डाव कोसळला. अक्षर पटेल आणि समीर रिझवी स्वस्तात बाद झाले, तर आशुतोष शर्माने १९ धावांची छोटी पण आक्रमक खेळी केली. तरीही दिल्लीला विजय मिळवता आला नाही.

या पराभवासह दिल्ली कॅपिटल्सचा चार सामन्यांतील हा दुसरा पराभव ठरला, तर चेन्नईने अखेर विजयाची चव चाखत स्पर्धेत जोरदार कमबॅक केलं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा