Saturday, April 11, 2026

आदर्श गृहस्थ कसा असावा?

आदर्श गृहस्थ कसा असावा?

महाभारतातील मोतीकण - भालचंद्र ठोंबरे

पद्मपुराणानुसार एकदा सागर राजाने और्व ऋषींना आदर्श गृहस्थ कसा असावा असा प्रश्न केला. तेव्हा और्व मुनी म्हणाले, “सत याचा अर्थ साधू व साधू जे आचरण करतात, त्याला सदाचार म्हणतात. त्या आचरणाची व्याख्या सप्तर्षी मनू व प्रजापती यांनी केली आहे”.

शहाण्या माणसाने सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून धर्म व धार्मिकतेचे चिंतन करावे. त्यानुसार धर्मानुकूल प्रापंचिक कर्तव्याचे सुद्धा चिंतन करावे. नंतर प्रातर्विधी आटोपून स्नान संध्या करावी. वृक्ष, गाय, सूर्य, अग्नी, वायू , गुरू व विप्र यांच्या देखत मलमूत्र विसर्जन करू नये. त्याचप्रमाणे गोठ्यात, रहदारीच्या रस्त्यावर, नदीत, तलावात, स्मशानातही मलमूत्र विसर्जन करू नये. मलमूत्र विसर्जनाच्या वेळी मौन पाळावे.

तद्नंतर नदीत, तलावात, घरच्या अगर देवळातील विहिरीच्या पाण्याने स्नान करावे. स्नानानंतर धूत वस्त्र नेसून देव, ऋषी, पितर यांच्यासाठी तर्पण करावे. तसेच गुरू, गुरू पत्नी, मामा, मित्र व राजा तसेच सर्व भूतमात्र व देवांसाठी तर्पण करावे व ते या जलाने तृप्त होवोत, अशी प्रार्थना करावी. तद्नंतर आचमन करून सूर्याला अर्ध्य द्यावे व कुलदैवत व इष्ट देवतांचे पूजन करावे. अग्निहोत्र करून प्रजापती व कश्यप यांना आहुती द्यावी व त्यातून उरलेली द्रव्ये दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला टाकावीत.

त्यानंतर पूर्वेला इंद्र, पश्चिमेला वरूण, उत्तरेला चंद्र व दक्षिणेला यम या दिक्पालांची पूजा करावी. नंतर वैश्वदेव करून अंगणात अतिथीची वाट पाहावी. अतिथी हा पांतस्थ किंवा वाटसरू असून त्याचे जवळ कसेलेही सामान अथवा शिदोरी नसावी. अशा अतिथीचे नांव, गाव,जात, धर्म, गोत्र, शिक्षण न विचारता उत्तम प्रकारे स्वागत व पूजन करून त्यास भोजन देऊन तृप्त करावे. त्यानंतर जर कोणी साधू, संन्यासी अथवा माधुकरी मागण्यास आल्यास भिक्षा द्यावी. अतिथींना संतुष्ट न करता भोजन करणारा पापाचा भागीदार होतो.

यानंतर लहान मूल, माहेरवाशीण कन्या, विधवा, गरोदर स्त्री, वृद्धांना भोजन द्यावे. व त्यानंतर स्वतः भोजन करावे. असे न करता तसेच स्नानाशिवाय व पूजा किंवा जपजाप न करता सर्वांच्या अगोदर भोजन करणारा अभक्ष्य भक्षण करणारा ठरतो. भोजन करताना मौन बाळगून एकाग्रतेने भोजन करावे. उच्च आसनावर बसून जेऊ नये. नेहमी ताजे अन्न सेवन करावे. कोरड्या चटण्या व लोणचे ही सदैव ताजीच मानली जातात. जेवणानंतर आचमन करून हात धुवावे. ताटात हात धुवू नयेत. जेवणानंतर अल्पकाळ विश्रांती घेऊन उद्योगाला लागावे. दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी कथा, पुराण यांचे वाचन व श्रवण तसेच धर्मविषयक बाबीवर चर्चा करावी. सायंकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी संध्या करावी. संध्या न करणारा पापाचा भागीदार होतो. सुतक व आजारपणात संध्या करू नये.

सायंकाळी मंत्रविरहित वैश्वदेव करून अन्नदान करावे. अतिथी आल्यास त्याच्या भोजन व विश्रांतीची व्यवस्था करावी. दिवसा अतिथी विन्मुख जाण्याने जेवढे पाप लागते त्याच्या आठपट पाप रात्री अतिथी विन्मुख जाण्याने लागते. अखेरीस घरधनीने भोजन करून भोजनानंतर दोन ते तीन तासांनी झोपावे. झोपतांना डोके पूर्वेस अथवा दक्षिणेस असावे. स्वपत्नीशीच व ऋतू काळी (मासिक पाळी झाल्यावर) संबंध ठेवावा. या संदर्भात परस्त्रीचा विचारही करू नये, अन्यथा मनुष्य या इहलोकी अल्पायुषी तर मृत्यूनंतर नरकवासी होतो.

गृहस्थाचे वर्तन सदाचारी गृहस्थाने संयमाने वागावे. स्वच्छ व नीटनेटकी वस्त्रे नेसावी. केस विंचरलेले असावे. दुसऱ्याचे द्रव्य लुबाडू नये अथवा त्याची लालसाही ठेवू नये. खोटी खुषामत व परनिंदा करू नये. एकट्याने प्रवास करू नये. नदीकाठी मुक्काम करू नये. पाण्याच्या विरुद्ध धारेत उभे राहून स्नान करू नये. जळक्या घरात प्रवेश करू नये, तसेच झाडावर शेंड्यापर्यंत चढू नये. ओसाड घरात एकट्याने राहू नये.

नितीबाह्य वर्तन करणारा, संशयखोर व कपटी माणूस यांच्याशी दोस्ती करून नये. ज्ञानी तसेच अज्ञानी व्यक्तीसोबत वादविवाद करू नये. या बदलात थोडाफार त्रास सहन करावा लागला तरी सहन करावा. आदरणीय व्यक्तीसमोर पायावर पाय टाकून किंवा पाय पसरून बसू नये. थुंकी, विष्टा, मुत्रं व रक्त ओलांडून जाऊ नये. झोप, जागरण, स्नान, व्यायाम यांचा अतिरेक करू नये. नग्न अवस्थेत स्नान, आचमन करू नये व झोपूही नये. केस विंचरल्याशिवाय देवपूजा व आचमन करू नये. घराबाहेर पडण्यापूर्वी देवाला व मोठ्यांना नमस्कार करावा. सर्वांना आधार द्यावा. रागावलेल्या व्यक्तीला शांत करावे, घाबरलेल्यांना धीर द्यावा, चालताना हातात काठी व पायात वहाण असावी. सत्य बोलावे पण जर ऐकणाऱ्याला त्याचा उद्वेग वाटत असेल तर मग मौन बाळगावे. प्रिय वाटणारे असत्य बोलू नये.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा