गॅस दुरुस्ती आणि मी

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ


रोघरी गॅस शेगडी आहे. आपल्याला नेहमीच एक अनुभव येत असेल जो मलाही नेहमी येतो तो मी आपल्याशी शेअर करू इच्छिते. हलकासा गॅसचा वास येत होता म्हणून गॅस शेगडी दुरुस्त करणाऱ्याला घरी बोलावले. तो आला. किती खर्च येईल, म्हणून त्याला दोनदा विचारले तरी त्याने एकदाही उत्तर न देता आपले काम सुरू केले. इथून गॅस लिक होत आहे, असे म्हणून ते
त्याने उपसले.


गॅस कंट्रोल व्हॉल्व्ह (Gas Valve)  असे त्याला म्हणतात, असे मला त्यांनी पावती दिल्यावर कळले. त्याने नवीन पाईप बॅगेतून काढल्यावर त्याला सांगितले की सहा महिन्यांपूर्वीच तर आम्ही पाईप बदलला आहे. तर म्हणाला की गॅस कंट्रोल व्हॉल्व्हमधून अधिकच्या वेगाने या पाईपमधून गॅस गेल्याने हा व्हॉल्व्ह बिघडला आहे, त्यामुळे पाईप बदलावाच लागेल. ‘गॅस’ म्हणजे जीवाशी खेळ ना, त्यामुळे मी गप्प राहिले. त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते बटनाजवळ लाइटर आणून किंवा काडेपेटीची काडी पेटवून कशी मोठी आग बाहेर येतीये, हे दाखवतात त्याप्रमाणे त्यांनी ते व्यवस्थित दाखवले. समोर मुलगी उभी होती तिला ही गोष्ट अजून माहीत नव्हती ती खूप घाबरली. दोनपैकी एक बटन बदलायला लावले, जे मला अजिबात बदलायचे नव्हते पण मुलगी म्हणाली की आई, तो सांगतोय तर बदलून टाक. तेही मी सहन केले. इतकेही करून त्याचे समाधान झाले नाही आणि म्हणाला की यातला एक बर्नर खराब झाला आहे. तो पितळा बर्नर कसा काय खराब होणार?, माझ्या मनात विचार आला. तर त्याची भोकं मोठी झाली आहेत, असे म्हणाला. एखाद वेळेस आगीचा मोठा ज्वाळही त्यातून बाहेर येऊ शकतो, अशी पुढे पुस्ती जोडली. आपल्याला त्यातले काहीच कळत नसल्यामुळे आणि ‘गॅस’ या गोष्टीची भीती वाटत असल्यामुळे ‘आलिया भोगासी असावे सादर!’ अशा भूमिकेतून मी नमते घेतले. नवीन सर्व वस्तूंची नावे लिहून खाली त्याच्या येण्या-जाण्याचे पैसे लावून, पाच हजार पंचवीस रुपयांची त्याने पावती बनवली. मी त्याला शांतपणे ऑनलाइन पैसे दिले. माझे पैसे देऊन झाल्यावर त्याने गॅस कंट्रोल व्हॉल्व्ह, बर्नर आणि गॅसचे चालू बंद करायचे बटन उचलले आणि तो बॅगेत टाकू लागला तेव्हा मी त्याला म्हटले की हे मला ठेवावे लागेल. त्याने मला विचारले की याचा तुम्हाला काय उपयोग? मी म्हटले, कदाचित या सगळ्या वस्तू चांगल्याही असतील. मला आणखी कोणाकडून तरी चेक करून घेता येतील. त्यानंतर त्याने मला शंभर, तीनशे आणि चक्क पाचशेपर्यंत रक्कम देऊ केली आणि ते काढलेले सामान मागितले. मी म्हटले हे सर्व खराब झालेले सामान आहे म्हणून तर तू काढले मग ते तुला कशासाठी हवे आहे? ते जर रिपेअर होत असेल तर मीच रिपेअर करून ठेवते म्हणजे पुढच्या वेळेस तुला हेच लावता येईल! त्याच्याकडे काही उत्तर नव्हते; परंतु तो अजूनही रेंगाळत होता, ते सामान त्याला मिळावे म्हणून... शेवटी तो गेला. मी ते सर्व सामान पिशवीत भरून ठेवून दिले. साधारण सात महिन्यानंतरची गोष्ट. परत थोडासा गॅसचा वास येऊ लागला त्यामुळे आम्ही ज्या दुकानदाराला आधी फोन करून निरोप दिला होता त्याला परतून निरोप दिला. आज येतो, उद्या येतो करून तिसऱ्या दिवशी त्याने एका माणसाला घरी पाठवले. आल्या आल्या त्या माणसाने सांगितले की गॅस कंट्रोल व्हॉल्व्ह खराब झाला आहे, तो बदलावा लागेल. आता नवीन प्रकारचे गॅस कंट्रोल व्हॉल्व्ह आलेले आहेत आणि त्याची किंमत चौतिसशे रुपये आहे. मी त्याला रिसीट काढून दाखवली आणि सांगितले की जरूर बदल पण एक वर्षाची गॅरंटी आहे. त्याने मला सांगितले की गॅरंटी ही फक्त गेल्या वर्षी होती. यंदापासून ही गॅरंटी सहा महिन्यांची झाली आहे. मी मूळ दुकानदाराला जिथे तक्रार नोंदवली होती त्याला फोन लावला आणि सांगितले की हा असं म्हणत आहे. तेव्हा त्या माणसाने याला सांगितले की त्यांच्याकडून कोणतेही पैसे घ्यायचे नाहीत कारण ती वस्तू गॅरंटीमध्ये आहे.


याने चरफडत रागारागाने तो व्हॉल्व्ह काढला. व्हॉल्व्ह काढताक्षणी भसाभसा गॅस बाहेर येऊ लागला. ते पाहून तो मला म्हणाला की मेन गॅस स्विच बंद करा. मी त्याला म्हटले की तो व्हॉल्व्ह परत लाव आणि तू तो स्विच बंद कर कारण तो फार उंचावर आहे. तो म्हणाला की हा गॅस बाहेर येतोय तिथे तुम्ही बोट लावा आणि मी स्विच बंद करतो. मला आधीच गॅसची खूप भीती वाटते त्यातून तो गॅस बाहेर येताना मी पाहिला होता. मी त्याला परत व्हॉल्व्ह लावून मेन गॅस स्विच बंद करायला सांगत होते. त्याने गॅस तसाच बाहेर येऊ देत खाली वाकून त्याच्या बॅगेतून एक गॅस कंट्रोल व्हॉल्व्ह बाहेर काढला. मी त्याला म्हटले की इतकी महागडी अठराशे रुपयांची वस्तू आणि अशी उघडी कशी? ना त्याला कोणते सील ना कोणता बॉक्स. तो म्हणाला की आजपर्यंत गॅसच्या कोणत्याही पार्ट्सला तुम्ही सील पाहिले आहे का? असेच येतात हे सगळे! म्हणत त्याने तो व्हॉल्व्ह बसवला. चिडचिड करत त्याने त्याची बॅग उचलली आणि त्याचे येण्याजाण्याचे पैसे घेऊन तो निघून गेला.


गॅस शेगडी दुरुस्त करणारी माणसे अधूनमधून आपल्याला बोलवावीच लागतात! बर्नरची छिद्रे स्वच्छ करणे किंवा साधी झडप (Valve) दुरुस्त करण्याऐवजी पाईप, रेग्युलेटर किंवा बर्नर जबरदस्तीने बदलायला सांगून आपल्याकडून जास्त पैसे उकळतात. गॅस गळतीचे खोटे कारण सांगून भीती दाखवतात. आपल्याला त्यातले फार कळत नसल्यामुळे आपण घाबरतो आणि त्यांचे त्यामुळे फावते.


आपल्यापैकी प्रत्येकाला हा अनुभव येतच असतो. एखादी वस्तू बसवायच्या आधी त्याला त्या वस्तूची गॅरंटी किती दिवसाची आहे हे विचारणे आणि तसे ते पावतीवर नमूद करायला सांगणे, आवश्यक आहे. जो दुरुस्तीसाठी येतो त्याचा नावासहित फोन नंबर लिहून ठेवणे जरुरी आहे. आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आल्यावर त्याविषयी तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. आपल्याला आलेले अनुभव इतरांबरोबर शेअर करणेही जरुरी आहे, जेणेकरून
इतरांना त्याचा फायदा होऊ शकेल! कारण संत समर्थ रामदास स्वामींने म्हटलेच आहे,
जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे,
शहाणे करून सोडावे, सकळ जन!
pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment

प्रेरणाच महत्त्वाची...

गोष्ट लहान, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात यश, प्रगती आणि समाधान मिळवण्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात;

उत्तर व दक्षिण गोलार्ध

विज्ञानकथा - प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे मित्र सहलीला गेले असताना चर्चा करत होते.“आपली पृथ्वीही फिरते वाटते?”

अस्वलाचं बाळ

कथा - रमेश तांबे सूर्य उगवला आणि त्याची प्रकाश किरणे साऱ्या जंगलात पसरली. सारं जंगल उजळून निघालं. झाडे-झुडपे, वेली

क्वाँटम कॉम्पुटर्स : विज्ञानाची गरुडझेप

तंत्रज्ञान - प्रा. प्रवीण पांडे सध्याचे युग हे विज्ञान आणी तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात अत्यंत

इतरांना योग्य मार्गाला लावा

गोष्ट लहान, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर समाजात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या विचारांची, स्वभावाची आणि अनुभवांची

काचेपलीकडचे जग

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ शारीरिक प्रकृती उत्तम असूनही माणूस कधीकधी मनाने खचतो म्हणजे शरीरापेक्षा मन ही