जैसे ज्याचे कर्म तैसे...

मनस्वीनी - पूर्णिमा शिंदे


आपल्या मनामध्ये नेहमी दोन झाडे असतात एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. आपण ज्या झाडाला जास्त खतपाणी घालतो तेच झाड फोपावतं. म्हणजेच दोन लेकरं होती. तू झाडावर चढला तर पडशील. एकाला आई म्हणाली आणि दुसऱ्याला झाडावर चढ म्हणून आई सांगत होती. त्या दोन लेकरांमध्ये जिथे आई नकारात्मक झाली तो मुलगा मागे राहिला आणि दुसरीकडे सकारात्मकतेने मुलगा झाडावर चढला. तसंच असतं. आपलं भलं करतो, चांगलं करतो, असा विश्वास ठेवला तर देव निश्चितच आपल्याला चांगलं ठेवतो. यातून आत्मबळ, प्रेरणा मिळते. अदृश्य वैश्विक ऊर्जा जे ऐकत असते, तेच पुन्हा आपल्या आयुष्यात येत असते. काही नकारात्मक माणसे असतात की जी लोकांचं भलं न करता वाईटच विचार करतात. आपण कुणाचं चांगलं करू शकलो नाही तर निदान वाईट तरी करू नये. चांगली माणुसकीची नैतिक भावना सुद्धा त्यांच्यामध्ये नसते. त्यांची नीतिमत्ता साफ नसते. त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. म्हणतात ना कर्माज रिटर्न. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. माणसाकडे सर्वकाही असूनही जर तो लोकांच्या वाईटच विचार करत असेल तर त्याने दुसऱ्यासाठी खणलेला खड्डा हा नेहमी स्वतःसाठीच असतो. नियती ही शिक्षा जरूर देते.


आपल्या आजूबाजूला असणारी वैश्विक ऊर्जा म्हणजे युनिव्हर्स, वास्तू काय म्हणते तथास्तु, जिव्हाग्रे वसते लक्ष्मी. जिभेवर असलेली शक्ती आपली मनो देवता एक अदृश्य शक्ती. आपल्या आजूबाजूला असते. विचार केला, चांगुलपणाने केला, इतरांच्या लोकहिताचा केला तर निश्चित देव तसे फळ देतोच. पण जर तुम्ही कोणाच्या वाईटचा विचार करत असाल तर त्यातून आपले स्वतःचे वाईट होते. जेव्हा जेव्हा अशा काही विकृती, प्रवृत्ती समाजामध्ये दिसतात त्या तिथल्या तिथे ओळखा आणि दूर व्हा अशा विष पेरणाऱ्या नैराश्यजनक विशवल्लीपासून. कारण आपण जे कमावलेलं असतं ते सत्य, न्यायी परखड आपल्या चांगुलपणाची ही पुंजी आपली असते. सर्वांचा आशीर्वाद असतो. पण माणूस जाताना फक्त दोन गोष्टी बरोबर घेऊन जातो. एक आशीर्वाद किंवा शाप म्हणजे तळतळाट. मग आपलं आपण ठरवायचं आपण बरोबर घेऊन काय जाणार आहोत? ८४ लक्ष योनीतून लाभलेला मानवाचा जन्म हा सफल करायचा की विफल! शाश्वत करायचा की नश्वर? स्वर्गात जायचं की नरकात पापात. आपलं आपण ठरवायचं असतं! तसं कर्म करायचं असतं. धर्म, अध्यात्म, देवपूजा यांच्या भाकड वेगळ्या खोट्या मिथ्या असत्य अन्यायकारक गोष्टी आपल्या वर्तनातून काढून टाका. देव बघत असतो. सुदैवाने देवाच्या दारी कोणीही वाचत नाही. सगळ्याचा ओटीपी कर्माचा ओटीपी हा देवाच्या संदेशातून मिळतोच. देवाची काठीही आवाज न करता लागते. हे तितकच खरं.


दयाळू परमेश्वर कधीच आपल्या भक्ताची श्रद्धा विश्वास भक्ती तोडत नाही. कारण त्याच्या हातून झालेलंं इतरांचं भलं हेच वेळोवेळी त्याला प्रकाश किरणाची साथ देत असतं. आणि रस्ता दाखवत असतं म्हणून आपल्या मनात भक्तीचा खोलवर प्रकाश दडला पाहिजे. आपल्या विचारांचा कवडसा भक्तीत रुजला पाहिजे. मानसिक विचार, संतुलित आहार आणि परोपकारी असले पाहिजे. दिखावा नको. कोणालाही इजा पोहोचवणारे कोणाच्या मनाला दुःख देणारे आयुष्याला चटके देणारे किंवा कोणाच्या हृदयातून अश्रू निघणारे नसावेत. स्वतःपेक्षा इतरांचा पहिला विचार जो करतो नक्कीच त्याला देवाचे देवत्व प्राप्त होतं. द्वेष ,कपाट, मत्सर राग, दुस्वास, तिरस्कार यातून इतरांना परपीडा देणारी माणसे आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. भले कितीही मोठी असू द्या. ती कायम कोत्या मनाची संकुचित वृत्तीची आणि असमाधानी अयशस्वी अशांत अस्वस्थ राहतात. पराभूत होतात. कारण त्यांची दिशा ही मुळातच चुकीची असते. त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ त्यांनी केलेल्या कर्माची परतफेड असते. चिंच लावा, चिंच मिळेल. आंबा लावा, आंबा मिळेल. पेरावे तसे उगवते. तुम्ही जे पेरून ठेवलेले आहे तेच तुमच्या बरोबर तुम्ही घेऊन जाणार आहात. यामध्ये दुसरा कोणीही काहीही करू शकणार नाही. आपल्या कर्मावर दृढ विश्वास ठेवा. यातूनच सत्य-असत्य, खरं-खोटं चांगले-वाईट कायम तुम्हाला दिशा दाखवीत राहील. आत्मपरीक्षण करा. पुढे चला. ज्या माणसाची कर्म चांगली आहेत त्याला सदैव ईश्वराचे वरदान असते. पावलोपावली देव त्याचे रक्षण करतो आणि तो राक्षसी शक्तीचा नायनाट करतो. ईश्वर चिंतनातून त्याला सुख- शांती-समाधान लागते. कारण तो चांगल्या मनाचा आहे. पण वाईट शक्तीला दुर्जनांना पापाचा आधार द्यावा लागतो. त्यामुळे कधी ना कधी पापाचा घडा भरत जातो. कोणतीही वस्तू मिळविण्यासाठी अट्टहास हट्ट अपेक्षा नसाव्यात. भाकड अपेक्षांचे ओझं माणसाला कायम पंगू बनवतात. निराशावादी नकारात्मक बनवतात. आणि अपराधी मनाने चोरून हिसकावून ओरबाडून लुबाडून मिळालेल्या सुखात कधीच आनंद नसतो ! कोणाच्या वाटेत काटे कधीच पेरू नका! ही चूक कायम तुम्हाला मनाला खात राहील! अपराधीपणाची शेवटपर्यंत जाणीव करून देत राहील. सुखाने झोपू देखील देणार नाही. त्यामुळे ज्याच्यामध्ये अलौकिक शक्ती आहे त्या शक्तीचा वापर ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी आनंद न्याय सत्य आयुष्य जीवन जगण्यासाठी करावा. नश्वर गोष्टींच्या मागे उगाच लागू नये. आपल्या आशा अपेक्षा, लालसा, वासना इतरांवर लादू नये. कोणी अमरत्व घेऊन आले नाहीये. हे चिरंजीवित्व कोणालाच नाहीये.


एक ना एक दिवस सगळं सोडून आपल्याला जावेच लागेल. तेव्हा आपण येथून काय घेऊन जाणार आहोत. मोह गर्व अहंकार राग द्वेष बाजूला ठेवा. हे प्रत्येकाने ठरवा. आजच या क्षणापासून स्वतःमध्ये इतका बदल करा. माणूस असेल तर करता येईल. ज्याला करता येणार नाही तो माणूस कसला? ज्याच्या हृदयामध्ये माणुसकीच शिल्लक नाही. माणूस म्हणून इतकं तर करता आलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांत कधी अश्रू उभे राहू नये! एखाद्या वाईट विचार आपल्या मनाला स्पर्श सुद्धा नाही. एखाद्या दुःखाचं कधीच कारण होऊ नये. कोणालाही अडचणीत दुःखामध्ये साथ द्यावी. तरच देव आपली भरभराट करेल. नाहीतर देव सुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपाने आपली परीक्षा बघायला येणारच! कारण त्या माणसाच्या हृदयातील हाय मनापासून लागलेली असते. हे विसरता कामा नये आणि कोणाची हृदयातून निघालेले अश्रू त्याची हाय त्याचा तळतळाट त्याचा शाप हा आपल्या आयुष्याला लागू नये म्हणून इतकी तरी भीती बाळगा! आपल्यामुळे दुसऱ्याच्या मन, डोळ्यांत पाणी येऊ नये तो मानव !आणि आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यांत पाणी येतं तो दानव. हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण कोण आहोत? जर आपल्याला आपले आयुष्य सुखा-समाधानाने शांतपूर्ण सुखाने जगायचे तर इतरांना डिवचू नका. मानवतावादी असाल तर मदतीला धावून जा! बचाव करा खरे माणूस असाल तर खरे पणाने, माणुसकीने माणसासारखे वागा. दानव असाल तर राक्षसासारखे वागा. आपली आपली चॉईस आता असली तरीही स्वर्ग की नरक ही चॉईस मात्र त्या भगवंताचा असेल बरं का! ईश्वराच्या महान संदेशापुढे आपण काहीच नाही, डोळे बंद करा. स्वतःला समजून घ्या! आपण कुठे आहेत? तपासा. देवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी करा. शेवटी विजय सत्याचाच.

Comments
Add Comment

“रहें न रहें हम, महका करेंगे...”

स्मृतीपटल - अनिल रा. तोरणे 'मदत’ हा शब्द ऐकताना जितका चांगला वाटतो तितका तो दुसऱ्याला मदत करताना वाटत नाही; परंतु

चांद के पार चलो...

वेध - शंतनु चिंचाळकर - विसाव्या शतकात अपोलो मोहिमेने चंद्रावर ठेवलेले पाऊल मानवी जिद्दीचे सर्वोच्च शिखर मानले

सौर ऊर्जा : येणाऱ्या काळाची आत्यंतिक गरज

तंत्रज्ञान - प्रवीण पांडे मित्रहो, मोठमोठ्या शहरांचा होणारा अति प्रचंड विस्तार, औद्योगिक विकासामुळे तसेच

या हट्टी आणि आळशी टीनएजर्सचे करायचं काय?

आनंदी पालकत्व - डाॅ. स्वाती गानू आजकाल अनेक पालकांची तक्रार असते, की त्यांची किशोरवयीन मुलं आळशी झाली आहेत,

नारळीकरांचे बु‌द्धिवैभवी जग

नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड मी टीव्हीवर मुलाखती घेत होते, तो काळ मजसाठी बुद्धिवैभवी होता. अत्यंत आनंदाचा

निर्धार

जीवनगंध - पूनम राणे एक मुलगा आपल्या आईसोबत कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गेला होता. दुकानदार इतर गिऱ्हाईकांशी