निर्धार

जीवनगंध - पूनम राणे


एक मुलगा आपल्या आईसोबत कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गेला होता. दुकानदार इतर गिऱ्हाईकांशी हसून आनंदाने बोलत होता. या मुलाच्या आईकडे मात्र तो कपडे फेकत होता. मुलाच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. तो मनाशीच विचार करत होता. “इतरांशी हा दुकानदार हसून खेळून बोलतोय मात्र आपल्याशीच असं का वागतोय?” असे छोटे छोटे प्रसंग, हा मुलगा आपल्या मनात साठवत होता. लहानपणापासूनच त्याच्या वडिलांनी त्यांना वाचनाची सवय लावली होती. संत साहित्य, कबिराचे दोहे, रामायण, महाभारत यांच्या कथाही त्याचे वडील त्यांना सांगत असत.


पुढे हा मुलगा शाळेत जाऊ लागला. शाळेतही त्याला वर्गाच्या बाहेर बसवले जाऊ लागले. एकदा एक गणित इतर मुलांना येत नव्हते. या छोट्या मुलाने ‘मी गणित सोडवतो,’ असे म्हणून वर्गात प्रवेश केला. हातात खडू घेऊन फळ्याजवळ जाणार इतक्यात वर्गातील सर्व मुलांनी त्याला थांबवले. ‘तू तिकडे जाऊ नकोस, कारण आमचे जेवणाचे डबे तिथे ठेवलेले आहेत.’ असे का?... या प्रश्नाचे उत्तर मात्र हा मुलगा स्वतःच्या मनालाच विचारत होता.


शाळेतील शिपाई गैरहजर असेल तर त्याला पाणी सुद्धा मिळत नसे. कारण इतर मुले नळ चालू करून द्यायला सुद्धा जवळ येत नसतं.
बैलगाडीत बसल्यानंतर हा मुलगा महाराचा आहे, हे समजतात गाडीवाल्याने त्याला गाडीतून खाली उतरवले. हिंदू खानावळची दारे बंद केली, तर पारशी खानावळीने पानावरून उठून अपमानास्पद वागणूक दिली. इतके मानभंगाचे प्रसंग आले, तरी कुठेही या मुलाने हार मानली नाही.


असाच एक प्रसंग. पावसाळ्याचे दिवस होते. मुसळधार पाऊस बाहेर पडत होता. या मुलाकडे छत्री नव्हती. भर पावसात हा मुलगा भिजत शाळेत निघाला. बाहेरच पेंडसे गुरुजी उभे होते. त्यांनी त्याला पाहिलं आणि म्हणाले, ‘अरे, तू तर भिजतच आलास!’ त्यांनी आपली छत्री देऊन त्याला आपल्या घरी पाठवलं आणि तिथे जाऊन कपडे बदलून हा मुलगा पुन्हा शाळेत आला. आशेचा किरण या मुलाला दिसू लागला.


असे अनेक प्रसंग या मुलाने मनाला लावून घेतले नाहीत, तर मनावर घेतले. मनापासून मोठ्या निर्धाराने अभ्यास सुरू केला. या मुलाचे नाव होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. समाजात जीवन जगत असताना अपमान, भेदाभेद, उपेक्षा, तिरस्कार त्याच्या वाट्याला आले. या साऱ्या प्रश्नावर त्यांनी एकच निर्धार केला. यावर एकच उत्तर ते म्हणजे, शिक्षण... शिक्षण... शिक्षण...


शिक्षण ही शोषणमुक्तीची पायवाट आहे. शिक्षणातून समाज परिवर्तन होईल असा त्यांचा ठाम विश्वास होता. याकरिता १९४६ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय आणि १९४९ मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद विद्यालय सुरू केले. “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा,” या घोषवाक्याचे आपल्या आयुष्यात तंतोतत पालन केले.
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. कोलंबिया विद्यापीठाने विद्यापीठाच्या इमारतीसमोर त्यांचा पुतळा उभा करून त्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर “सिम्बॉल ऑफ द नॉलेज” ‘ज्ञानाचे प्रतीक’ अशी अक्षरे कोरलेली आहेत. ही आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.


वाचन हा त्यांचा छंद बनला होता. स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार हे शिक्षणाचे ध्येय असून शिक्षणातून व्यक्तीचा आत्मविश्वास आणि आत्मआदर वाढतो. शिक्षणामुळे सामाजिक आणि आर्थिक विकास होतो. विद्या, प्रज्ञा, करुणा, शील, मैत्री या पंचतत्त्वाचा अवलंब करून विद्यार्थ्यांनी आपली पात्रता आणि योग्यता वाढवावी असे ते म्हणत. ज्ञान आणि जिज्ञासा त्यांच्या श्रद्धेची प्रेरक शक्ती होती. ‘वाचाल तर वाचाल’ असे ते म्हणत. ग्रंथावर त्यांचे विशेष प्रेम होते. जगामध्ये वैयक्तिक ग्रंथालय कोणाचे नसेल इतके ग्रंथ त्यांच्याजवळ होते. मुंबईतील ‘राजगृह’ या निवासस्थानी त्यांनी उभारलेले व्यक्तिगत ग्रंथालय आहे.


वाचन हा त्यांचा आवडता छंद. त्याकरिता ते खाण्यापिण्यातून काटकसर केलेल्या पैशातून ग्रंथ खरेदी करत. साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. याची त्यांना पूर्ण जाणीव होती. म्हणून ते म्हणत, ‘मला इंजिनीयर हवेत. वकील हवेत आणि जास्तीत जास्त साहित्यिक हवेत. कारण उदात्त जीवनमूल्य आणि सांस्कृतिक मूल्ये साहित्य प्रकारातून अविष्कृत होत असतात.


शिक्षणाच्या जोरावर ३२ पदव्या आणि नऊ भाषांचे ज्ञान त्यांनी प्राप्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तम वक्ते, उत्तम पत्रकार, लेखक होते. समाजातील अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम वृत्तपत्रातून होते. बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध, वृत्तपत्रे सुरू करून वंचित, उपेक्षित, पददलित यांना जागे करण्याचे काम केले. त्यांचे अग्रलेख अभ्यासपूर्ण असत. अग्रलेखाच्या माध्यमातून त्यांनी वर्णभेद, दलितांच्या पाण्याचा प्रश्न, महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा प्रवेश, आंतरजातीय विवाह, ब्राह्मण, लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रवीर, धर्मगुरू, स्पृश्य-अस्पृश्य भेद इत्यादी विषयांवर क्रांतिकारी लेखन वृत्तपत्रांतून केले.


असामान्य बुद्धिचातुर्य आणि कमालीचा व्यासंग यामुळे ते भारतीय घटनेचे शिल्पकार ठरले. अशा या महान घटनाकार, ज्ञानोपासक, विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ, पत्रकार, समाजसुधारक, कायदेपंडित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

Comments
Add Comment

“रहें न रहें हम, महका करेंगे...”

स्मृतीपटल - अनिल रा. तोरणे 'मदत’ हा शब्द ऐकताना जितका चांगला वाटतो तितका तो दुसऱ्याला मदत करताना वाटत नाही; परंतु

चांद के पार चलो...

वेध - शंतनु चिंचाळकर - विसाव्या शतकात अपोलो मोहिमेने चंद्रावर ठेवलेले पाऊल मानवी जिद्दीचे सर्वोच्च शिखर मानले

सौर ऊर्जा : येणाऱ्या काळाची आत्यंतिक गरज

तंत्रज्ञान - प्रवीण पांडे मित्रहो, मोठमोठ्या शहरांचा होणारा अति प्रचंड विस्तार, औद्योगिक विकासामुळे तसेच

या हट्टी आणि आळशी टीनएजर्सचे करायचं काय?

आनंदी पालकत्व - डाॅ. स्वाती गानू आजकाल अनेक पालकांची तक्रार असते, की त्यांची किशोरवयीन मुलं आळशी झाली आहेत,

जैसे ज्याचे कर्म तैसे...

मनस्वीनी - पूर्णिमा शिंदे आपल्या मनामध्ये नेहमी दोन झाडे असतात एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. आपण ज्या झाडाला

नारळीकरांचे बु‌द्धिवैभवी जग

नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड मी टीव्हीवर मुलाखती घेत होते, तो काळ मजसाठी बुद्धिवैभवी होता. अत्यंत आनंदाचा