कथा - रमेश तांबे
सूर्य उगवला आणि त्याची प्रकाश किरणे साऱ्या जंगलात पसरली. सारं जंगल उजळून निघालं. झाडे-झुडपे, वेली सोनेरी प्रकाशात चमकू लागली. क्षणभरासाठी का होईना दवबिंदूचे मोती बनले. पक्ष्यांचा किलबिलाट अजून वाढला. मंद वारा जंगलात सुगंध वाहून नेऊ लागला. अशा या प्रसन्न वातावरणात डोंगराच्या कडेकपारीत राहणारं अस्वलाचं कुटुंब मात्र अजूनही झोपेतच होतं. आई अस्वल आणि तिचं छोटं बाळ दोघेच एकमेकांचे जोडीदार. तेच एकमेकांचा आधार.
बाळ आता दुडुदुडू पळू लागलं होतं. उड्या मारू लागलं होतं. बाळाच्या लीला बघता बघता आईच्या डोळ्यांत पाणी यायचं. तर कधी बाळाचं कौतुक तिच्या डोळ्यांत मावत नव्हतं. काळेकुट्ट केस, पांढरेशुभ्र डोळे, आई अस्वलाची आता जबाबदारी वाढली होती. कारण आधी ती एकटी होती. तिच्या आधी तिच्या जोडीदाराचा एका वाघाने तिच्या समोरच फडशा पाडला होता. त्यामुळे बाळाची सारी जबाबदारी तिच्यावरच होती. तिचं स्वतःचं अन् बाळाचं जंगली प्राण्यांपासून रक्षण करणं ही आई अस्वलाची जबाबदारी होती. आई अस्वल तशी तगडी होती, धिप्पाड होती. एक दोन वाघांचा हल्ला सहज परतावून लावेल अशी होती. पण आता तिच्यापेक्षा बाळाची सुरक्षितता तिच्यासाठी अधिक महत्त्वाची होती. म्हणून ती सतत बाळावर लक्ष ठेवून असायची.
मग एक दिवस आई अस्वलाची कसोटी बघणारा दिवस उजाडला. सिंहाचा एक कळप अस्वलाच्या दिशेने येऊ लागला. आईने आपल्या बाळाला ओरडून आत जाऊन लप असं सांगितलं. बाळ धावतच कपारीत जाऊन लपलं. आईला मात्र बाहेरच थांबावं लागणार होतं. आई अस्वलाने पाहिले एक सिंह आणि चार सिंहिणी आणि त्यांच्यासोबत त्यांची चार पाच लहान लहान बाळं! असा एक दहा जणांचा कळप हळूहळू आई अस्वलाच्या दिशेने येऊ लागला. आई अस्वलाला कळून चुकलं आता आपली काही धडगत नाही. पण तिला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती. तिच्या दृष्टीने तिचं बाळ सुरक्षित राहणं अधिक महत्त्वाचं होतं!
समोरच्या एका डेरेदार झाडाखाली सिंहाचा कळप विश्रांतीसाठी थांबला. त्यांची लहान लहान पोरं तिथे खेळू लागली. इकडे तिकडे पळू लागली. त्यांच्या आया बिनधास्त डोळे मिटून पडून राहिल्या. सिंहाच्या छोट्या बाळांकडे बघून आई अस्वलाला क्षणभर आपलंच बाळ त्यात दिसत होतं. त्या छोट्या छोट्या छाव्यांची गंमत अस्वलाचं बाळ गुहेतून बघत होतं. त्यालाही त्यांच्याशी खेळावंसं वाटत होतं. मग आईचं लक्ष नाही असं बघून अस्वलाच्या बाळानं छाव्यांच्या दिशेने धूम ठोकली. ते विचित्र दृश्य बघून आईचं अंग शहारलं. तिने बाळाला पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु बाळ निसटून पुढे निघून गेलं होतं. आता आरडाओरडा करण्यात काहीच अर्थ नव्हता. नाहीतर सगळा सिंहाचा कळप जागा होऊन लगेच हल्ला करण्यास प्रवृत्त झाला असता म्हणून ती गप्प बसली.
मग पुढचे दृश्य आई अस्वल मोठ्या आश्चर्याने बघू लागली. सिंहाचे छावे आणि तिचं बाळ मस्त खेळू लागलं. एकमेकांच्या अंगावर बसू लागलं. तीन तीन छाव्यांना पाठीवर घेऊन अस्वलाचं बाळ फिरू लागलं, धावू लागलं आणि तेवढ्यात घडू नये ते घडलं. सिंहाचा सगळा कळप जागा झाला. त्यांनी पाहिलं बाळ अस्वलाच्या पाठीवर आपली बाळं खेळतायत हे बघून त्यांचे चेहरे चिंताग्रस्त बनले पण क्षणभरच. कारण त्यांची बाळं अस्वलाच्या बाळासोबत मस्त खेळत होती. अर्धा तास झाल्यानंतर एक सिंहीण अस्वलाच्या बाळाजवळ आली आणि आपल्या जिभेने त्याला चाटू लागली. मग थोड्याच वेळात सगळा कळप जंगलाच्या दिशेने निघून गेला. जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या त्या छाव्यांकडे अस्वलाचं बाळ किती तरी वेळ एकटक बघत उभं राहिलं.
मग आई अस्वल धावतच बाळाकडे गेली. त्याच्या सर्वांगाला जिभेने चाटू लागली. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. छोट्या बाळांना इजा करू नये, हा जंगलाचा नियम सिंहांच्या कळपाने पाळला होता. कदाचित अस्वलाच्या बाळामध्ये त्यांना स्वतःचीच बाळं दिसली असतील.