नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे
संतकवींच्या साहित्यात अतिशयोक्ती अलंकाराची अनेक उदाहरणे आहेत. संत एकनाथ महाराजांची अशीच एक रचना होती. “चिंचेच्या पानावर देऊळ रचियले, आधी कळस मग पाया रे.” मुळात चिंचेचे पान किती लहान! त्यावर देऊळ रचायचे! तेही कसे, तर म्हणे आधी कळस चढवायचा मग त्याखाली पाया बांधायचा! सगळे अशक्यच! पण महाराजांनी मुद्दाम असे उदाहरण निवडले कारण अध्यात्माचे गूढ त्यांना सामान्यजनांना समजावयाचे होते.
नाथमहाराजांच्या या आपल्या महान पण अनामिक राहून गेलेल्या शिल्पकारांनी एकदा सत्यातही उतरवले होते! राष्ट्रकुट घराण्यातील राजे कृष्णराज यांच्यासाठी वेरूळच्या गुंफात ८व्या शतकात कोरलेले जगप्रसिद्ध कैलास लेणे ‘आधी कळस मग पाया’ याच पद्धतीचे होते! पण आपला विषय आहे सिनेमा! त्यामुळे नाथमहाराज, कैलास लेणे सोडून आपल्याला सिनेमाकडे वळावे लागेल.
तो होता १९५० ते १९६०चा मराठी सिनेमाचा सुवर्णकाळ. या काळातले पडद्यामागचे नायक होते तीन दिग्गज- राजा परांजपे, मराठीचे वाल्मिकी गदिमा, आणि सुधीर फडके. या त्रिमूर्तींनी सामाजिक विषयांवरचे अनेक कलात्मक आणि प्रबोधन करणारे सिनेमा दिले. त्यातलाच एक आला १९६१ला. प्रमुख कलाकार- रमेश देव, सीमा, राज गोसावी, कुसुम देशपांडे, नंदा फडके, भारती, मधू आपटे, रणजित बुधकर, ललिता देसाई, शरद तळवलकर, वैशंपायन, स्वत: राजा परांजपे आणि दीर्घ काळानंतर परतलेल्या दिगज्ज इंदिरा चिटणीस!
कथा साधीसरळ होती. प्रामाणिक कष्ट करून हॉटेल व्यवसायात यशस्वी झालेले मामा चिपळूणकर लक्षाधीश असतात. मात्र त्यांचा थोरला मुलगा अजिबात व्यवहार ज्ञान नसलेला पुस्तकी कीडा असतो तर धाकटा गोपाळ मुलींच्या मागे लागणारा आणि सर्वात कहर म्हणजे मुलगी यामिनी तर मुलांच्या मागे धावणारी! मामांची विधवा मेव्हणीही त्यांच्याकडेच राहात असते.
ही सर्व विचित्र पात्रे मामांसाठी चिंतेचा विषय होऊन बसतात. शेवटी मित्राच्या सल्ल्याने ते एक भन्नाट योजना आखतात. वकील असलेल्या मार्तंड पिर्सुलेकर यांच्या सहकार्याने ते असे उठवून देतात की त्यांना एक दुर्धर रोग झाला आहे आणि आता ते काही दिवसांचेच सोबती आहेत.
मग तातडीने त्यांचे मृत्यूपत्र तयार करून पिर्सुलेकरांकडे मुखत्यार म्हणून दिले जाते. घरातले सगळे वातावरण बदलते. त्याकाळी कुटुंबातील नाती आजच्यापेक्षा खूप स्पंदनशील असत. त्यामुळे सगळे या दु:खद बातमीने चिंतेत पडतात, घाबरून जातात. आपल्या चुका समजल्याने एकेक करून सगळे वठणीवर येतात. शेवटी गोपाळ आणि पिर्सुलेकरांची कन्या वृंदा यांचे लग्न होते आणि कथा सुखांत होते. ‘आधी मरणाची अफवा आणि मग चांगल्या जीवनाला सुरुवात’ अशी गंमतीशीर योजना असल्याने राजाभाऊंनी सिनेमाला नाव दिले ‘आधी कळस मग पाया.’
सिनेमातील सर्व म्हणजे पाचही गाणी गदिमांची होती. त्यामुळे थीम साँग ठरणाऱ्या गाण्यात रंजकतेबरोबर थोडे तत्त्वज्ञान येणे अटळच होते. गाण्याचा ठेका जुन्या रसिकांना सहज आठवेल कारण बाबूजींचे संगीत हेही त्याच्या लोकप्रियतेचे एक कारण होते. गदिमांचे शब्द होते - ‘कसे चालले असेल जग हे विचार याचा वाया रे, ही मायेची किमया अवघड, आधी कळस मग पाया रे.’ गदिमा एकेक उदाहरण देत समजावून देतात की हे विचित्र जग कसे काय चालते बुवा? असा विचार मनात आला तरी त्याला फार महत्त्व देऊ नये. कारण त्याचा काहीही उपयोग नसतो. त्या ‘वरच्याच्या’ मनात अतर्क्य कल्पना असतात आणि तो शेवटी सगळे सांभाळून घेतोच. गदिमांची उदाहरणे आश्चर्यात पडणारी असली तरी सहज पटणारीच असतात. ते म्हणतात, आपल्याला आधी पाणी दिसते आणि त्याला उष्णता मिळाल्यावर त्याची वाफ होते. शेवटी त्याच पावसाचे थेंब जलाशयात साठून आपल्याला पाणी मिळते. ज्या बीजातून फळे येतात असे आपल्याला वाटते ती तर फळाच्या पोटात असतात.
निसर्ग किती वेगवेगळे खेळ खेळत असतो. वसंतात सगळी झाडे हिरवीगार होण्यासाठी तर शिशिर पानगळ घडवतो. तो नवनिर्मितीसाठी केलेला विनाश नसतो का? मग कविराज मध्येच गीतेतील १५व्या अध्यायाच्या पहिला श्लोकाकडे वळतात आणि भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या विश्वाच्या उलट्या अस्वस्थवृक्षाची आठवण देताना त्याची तुलना मानवी शरीराशी करतात. जिवंत राहण्याच्या सर्व क्रियांचे मूळ असलेला मेंदू वर असतो. त्यातून जगण्याच्या सर्व क्रियांचे नियंत्रण करणारे मज्जातंतू म्हणजे जणू त्याच्या फांद्याच ना!
‘वाफेमधुनी उपजे पाणी, बीज फळाच्या पोटी रे, शिशिर जाळतो झाडेवेली, नव्या वसंतासाठी रे, मुळे वरी अन् खाली फांद्या अशी मानवी काय रे.’ देवाने पृथ्वी ‘आकाशात अधांतरी टांगली आहे’ असे बायबलमध्ये ‘इयोब’ नावाच्या भागात म्हटले आहे. त्याचीच आठवण देणारी गदिमांनी पुढची ओळ म्हणते, आकाशाचा नीळा घुमट, चक्क पृथ्वीवर तरंगतोय! पण विज्ञान म्हणते ‘अवकाशात वर आणि खाली’ असे काहीच नसते. पृथ्वीसुद्धा एका कोनातून आभाळावर विसावलेली दिसेल.
असाच आगळा दाखला देताना कविवर्य म्हणतात, प्रकाशाच्या आगमनाने अंधार नष्ट होतो असे आपल्याला वाटते. पण अंधारच नसेल तर प्रकाशाचे वेगळे अस्तित्व कसे सिद्ध करणार? ‘पृथ्वीवरती निळा घुमट हा, आभाळाचा राही रे, आभाळावर वसली पृथ्वी, नीट न्याहाळुनी पाही रे, उजेड मारी अंधारा पण त्याची आई छाया रे.’
निसर्गाची निर्मितीप्रक्रिया किती विचित्र असते ते सांगताना कवी म्हणतात धरणीमातेचे पोट फाडूनच एखादे रोप वर येऊ शकते म्हणजे विनाशाशिवाय नवनिर्मिती शक्यच नसते का? अनेकदा तर पुण्यवानाच्या पोटी पापी अपत्ये जन्माला येतात, पापी लोकांच्या समृद्धीचे मळे पुण्यवानांच्या घामावर पोसलेले असतात - ‘पोट फाडल्यावाचून धरणी बीज धरीना रोपाचे, पु्याईच्या खोडा फुटती नवे धुमारे पापाचे, पापावाचून पुण्याईच्या कशा पोसतील राया रे.’ शेवटी गदिमा पुन्हा फिलॉसॉफिकल होतात. कोणत्याही यशामागे कुणाचे तरी कष्ट कारणीभूत असतात, यशाचा कळस चढलेला असतो. जगाची गती चक्राकार असते. जीवनाचा शेवट मृत्यू असला तरी त्यातूनच पुढचा जन्म मिळतो. जसे पाण्यातून ढगांची निर्मिती होते आणि तेच ढग पुढे आपल्याला पाणी देतात. ‘कळसावरती असतो पाया, पायावरती कळस चढे, चक्रगतीने फिरते जग हे, अंतामागे जन्म घडे, तोयनिधीतून मेघ जन्मती, तेच निर्मिती तोया रे.’ सुंदर संगीताने मनोरंजन करताकरता अशी सहज तत्त्वज्ञान सांगणारी गाणी आता पुन्हा कोण लिहिणार? म्हणून तर आपला नॉस्टॅल्जिया!

