मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आशा भोसले यांच्या तब्येतीविषयी ताजी माहिती अद्याप मिळालेली नाही पण त्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. आशा भोसलेंची नात झानई भोसले हिने इन्स्टा पोस्ट करून आजी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले.
View this post on Instagram
आशा भोसले मागील सात दशकांपासून पार्श्वगायन करत आहेत. त्यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांतील चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. चुनरिया या १९४८ मध्ये आलेल्या चित्रपटापासून आशा भोसले यांच्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. आतापर्यंत त्यांनी वीसपेक्षा जास्त भाषांमध्ये १६ हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियनसह एकूण २० भाषांमध्ये आशा भोसले यांनी पार्श्वगायन केले आहे.
चतुरस्त्र गायिका आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. लता मंगेशकर त्यांची मोठी बहीण. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजाने कोट्यवधी रसिकांना वेड लावले. आशा भोसलेंनी दोन हजारांपेक्षा जास्त चित्रपटांतून गाणी गायली आहेत. अनेक अल्बमसाठीही त्यांनी गाणी गायली आहेत. आशा भोसलेंना २००८ मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. इतर अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे.






