परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घोडबंदर रोडचे पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) वाहतूक कोंडीचा विळखा सैल करण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पांना वेग दिला असून, रखडलेला 'मेट्रो १०' चा मार्ग येत्या ३ ते ४ महिन्यांत प्रवाशांसाठी खुला होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी केली. यासोबतच घोडबंदर रस्ता रुंदीकरण आणि अत्याधुनिक 'पॉड टॅक्सी' प्रकल्पाबाबत त्यांनी सरकारचा आराखडा मांडला.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरनाईक बोलत होते. यावेळी त्यांनी ठाणे आणि मिरा-भाईंदर पट्ट्यातील वाहतूक सुलभ करण्यासाठी ८ हजार कोटी रुपयांच्या विशेष नियोजनाची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच काशिगाव ते दहिसर मेट्रोचे लोकार्पण झाले. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार काशिगाव ते गायमुख हा मार्ग थेट 'मेट्रो ४' (वडाळा-कासारवडवली) ला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साधारण ८ हजार कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या नवीन मेट्रो जोडणीमुळे मिरा-भाईंदरकरांना ठाणे आणि मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.






