Friday, April 10, 2026

Mathura Accident : मथुरेत भीषण दुर्घटना! भाकिकांनी भरलेली बोट यमुनेत बोट बुडाली; ९ भाविकांचा मृत्यू

Mathura Accident : मथुरेत भीषण दुर्घटना! भाकिकांनी भरलेली बोट यमुनेत बोट बुडाली; ९ भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील मथुरा (Mathura) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीमध्ये (Yamuna River) पुलाला धडकून बुडाली. या अपघातात ९ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २२ जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब येथील काही भाविक दर्शनासाठी मथुरेत आले होते. भाविकांनी भरलेली बोट यमुना नदीतून जात असताना 'पांटून' या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याचवेळी बोट चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोट पुलाला जाऊन जोरात धडकली आणि काही क्षणांतच बुडाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छिमार, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू करत २२ प्रवाशांना वाचवण्यात यश आले. तसेच एनडीआरएफ (National Disaster Response Force) आणि SDRF च्या पथकांनीही मदतकार्य हाती घेतले आहे.

मथुरा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुरेश चंद रावत यांनी घटनास्थळी भेट देत सांगितले की, सर्व भाविक वृंदावन (Vrindavan) येथील देवराहा बाबा मठात जात होते. अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जखमींना तत्काळ मदत देण्याचे आणि मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक सहाय्य देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Comments
Add Comment