Friday, April 10, 2026

Mathura Accident : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू

Mathura Accident : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू
मथुरेतील वृंदावन येथे यमुना नदीत पर्यटकांनी भरलेली नौका उलटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत १० जणांचा बुडून मृत्यू झाला असून, २२ पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. अद्यापही अनेक जण बेपत्ता असून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास बांके बिहारी मंदिरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या केशी घाटाजवळ हा अपघात झाला. नदीतील पुलाजवळ भाविकांनी भरलेली ही नौका अचानक उलटली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत व बचाव पथकांनी तातडीने धाव घेतली.
मथुरेचे जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना नदीत शोधमोहीम सातत्याने सुरू असून गोताखोर बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या नौकेत ३० हून अधिक प्रवासी होते आणि हे सर्व पर्यटक पंजाबमधील लुधियाना येथून वृंदावन दर्शनासाठी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या लवकरात लवकर प्रकृती सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो," असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Comments
Add Comment