Friday, April 10, 2026

Iran-US-Israel War Ceasefire : अप्रत्यक्ष इराणला मदत करणारा पाकिस्तान शांतिदूत कसा ठरू शकतो ?

Iran-US-Israel War Ceasefire : अप्रत्यक्ष इराणला मदत करणारा पाकिस्तान शांतिदूत कसा ठरू शकतो ?

- पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर अमेरिकेचा प्रश्न

पाकिस्तानने अमेरिका-इराण संघर्षात मध्यस्थी केली होती. पण आता, याच मध्यस्थीवर संशयाचे सावट पसरले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA), जनरल माईक फ्लिन यांच्या एका वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजनैतिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या विमानवाहू जहाजावर हल्ला करण्यासाठी इराणने वापरलेली चिनी क्षेपणास्त्रे पाकिस्तानमार्गे पोहोचवण्यात आली होती, अशा वृत्तांवर जनरल माईक फ्लिन यांनी चिंता व्यक्त केली आहे.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मोसाद कॉमेंटरीच्या एका अहवालावर प्रतिक्रिया देताना जनरल फ्लिन यांनी याला एक अत्यंत गंभीर बाब म्हटले आहे. या अहवालात असा दावा करण्यात आला होता की, अमेरिकेच्या विमानवाहू जहाजाला लक्ष्य करण्यासाठी इराणने वापरलेली क्षेपणास्त्रे चिनी कम्युनिस्ट पक्षाने पुरवली होती आणि ती पाकिस्तानमार्गे पाठवण्यात आली होती. फ्लिन म्हणाले की, जर चिनी कम्युनिस्ट पक्ष पाकिस्तानमार्फत इराणला क्षेपणास्त्रे पुरवत असेल, तर ही एक युद्धजन्य कृती आहे.

५ लाख चिनी विद्यार्थ्यांवर बंदी घालण्यात यावी :

फ्लिन यांनी सुचवले की अमेरिकेने चीनला तात्काळ इशारा द्यावा आणि अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या ५ लाख चिनी विद्यार्थ्यांवर बंदी घालण्यासारखी कठोर पावले उचलावीत. फ्लिन यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील पाकिस्तानच्या मध्यस्थीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, जर क्षेपणास्त्रे पाकिस्तानमार्गे पाठवली जात असतील, तर त्यामुळे तो 'प्रामाणिक मध्यस्थ' कसा ठरतो? कुणालातरी वास्तवाला सामोरे जावेच लागेल.

अमेरिकेच्या लष्करी थिंक टँक, 'इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर' (ISW) ने देखील या दाव्यांना दुजोरा दिला आहे. ISW च्या मते, युद्ध सुरू झाल्यापासून चीनने इराणला क्षेपणास्त्र इंधनासाठी लागणारा कच्चा माल वारंवार पाठवला आहे. अहवालात म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायलने नष्ट केलेले भूमिगत क्षेपणास्त्र बंकर आणि सायलो इराण पुन्हा खोदत आहे. काही प्रकरणांमध्ये, हल्ल्यांच्या काही तासांच्या आतच ते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा