कणकवली : नारायण राणे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेली भाषणे ऐकण्याची बघण्याची संधी मला प्राप्त झाली. अर्थसंकल्पावरील त्यांची भाषणे नक्कीच अभ्यासू होती. त्यांनी यापुढे देखील आम्हाला सदैव मार्गदर्शन करत राहावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या. नारायण राणे परखड नेते आहेत. मुंबईमध्ये ५५ उड्डाणपुलांसह अनेक कामे नारायण राणे यांच्या सहकार्यामुळेच मी करू शकलो. त्यांचा शंभरावा वाढदिवस देखील आम्ही साजरा करणार आहोत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सौ. निलम राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, आशिष शेलार, नितेश राणे, उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार दीपक केसरकर, निलेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, नारायण राणे यांच्यासोबत सभागृहात काम करण्याची संधी मला मिळाली. नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करणे ही पर्वणी होती. माझ्या राजकीय यशाचे श्रेय नारायण राणेंसारख्या नेत्यांना जाते. त्यांची अर्थसंकल्पीय भाषणे ऐकताना एखादा अर्थतज्ञच बोलतोय असे वाटायचे. त्यांचे भाषण सुरू असताना सभागृह स्तब्ध असायचे तर राज्याचे अर्थमंत्री चिंतेत असायचे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून मला पहिल्याच टर्ममध्ये नारायण राणे यांच्याच पुढाकाराने पुरस्कार मिळाला. नारायण राणे हे देशाचे आणि राज्याचे नेते आहेतच. पण कोकणावर त्यांचे विशेष प्रेम आहे. कुठलेही काम गुणवत्तेने करावे, हा त्यांचा आग्रह असतो. नितेश आणि निलेश राणे यांच्यावर जेवढा अधिकार आहे, तेवढाच अधिकार नारायण राणे यांचा माझ्यावर देखील आहे, असे फडणवीस म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, नारायण राणे यांच्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार आले तरीही ते पुढे जात राहिले. १९९५ मध्ये युतीचे सरकार आल्यानंतर त्यांच्यासोबत मंत्री म्हणून काम करण्याची व त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात मला अनेक मित्र मिळाले, त्यातील जवळचे मित्र आणि मार्गदर्शक म्हणजे नारायण राणे. ते कोणताही निर्णय घेताना जनहित बघतात. त्यांचे प्रशासकीय कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्यासारखा विरोधी पक्षनेता महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेल्या नाही, अशा शब्दांमध्ये गडकरी यांनी त्यांचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, निर्धार आणि निश्चयाला मेहनतीची जोड दिली तर यश शक्य आहे. मी आणि मित्र हनुमंत परब दोघेजण बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक सभेला जायचो. एक दिवस बाळासाहेबांनी बोलावून घेतले आणि मग शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. बाळासाहेबांचा शब्द पूर्ण केला नाही, असे कधीच झाले नाही. आज माझे कौतुक होत आहे हीच माझी संपत्ती आहे. तरुणांनी त्याचाच पाठपुरावा करावा. पक्षाला गरज असेल तोपर्यंत मी नक्कीच कार्यरत राहीन. कारण मी आतापर्यंत कोणतेही पद मागितले नाही. मला सर्व पदे न मागताच मिळाली आहेत. आजचा सोहळा बघितला तर निलेश आणि नितेश हे माझे दोन्ही चिरंजीवही आयुष्यात मोठे यश मिळवतील अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली. यावेळी सुनील तटकरे, उदय सामंत यांनीही नारायण राणे यांना मनोगतातून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार, प्रास्ताविक डॉ. मिलिंद कुलकर्णी तर आभार पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले.






