Friday, April 10, 2026

BMC : महापालिका आयुक्त तपासणार आता प्रत्येक अधिकाऱ्यांचे प्रगतीपुस्तक

BMC : महापालिका आयुक्त तपासणार आता प्रत्येक अधिकाऱ्यांचे प्रगतीपुस्तक

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या कारभाराला गती देतानाच प्रत्येक कामकाजात शिस्त निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून आश्विनी भिडे यांनी आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. महापालिका आयुक्त आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक विभागांचा आणि विभाग कार्यालयांच्या कामांचा आढावा घेणार आहे. या आढावा बैठकीच्या माध्यमातून एकप्रकारे प्रत्येक अधिकाऱ्यांचे आणि पर्यायाने विभाग तसेच खात्यांच्या कारभाराचे प्रगतीपुस्तक तपासले जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या कारभारात पादर्शकता आणतानाच त्याला गती देणे आणि प्रत्येक कामे निश्चित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून नवनियुक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आता मासिक बैठकीचे आयोजन करण्याचा निर्धार केल्याची माहिती मिळत आहे. त्यादृष्टीकोनातून या महिन्याची मासिक सभा शनिवारी ११ एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी अशाप्रकारच्या आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये चारही अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, मुख्य अभियंता, प्रमुख अधिकारी, खातेप्रमुख आदींच्या कामांचा आणि त्यांच्या खात्यांचा आढावा घेवून त्यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांची प्रगती जाणून घेतली जाणार आहे. यामाध्यमातून प्रत्येक महिन्याला पहिल्या बैठकीत सादर केलेल्या कामांचा पुढील बैठकीत आढावा घेतला जाईल, अशी माहिती मिळत आहे.

यापूर्वी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मासिक सभेची संकल्पना राबवून महिन्याचा मानकरी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती. ज्यामुळे कामगारांमध्ये स्पर्धा निर्माण होवून प्रत्येक विभाग कार्यालय आणि प्रत्येक विभाग तथा खाते हे उत्तमोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न असायचे. याचा परिणामही महापालिकेच्या कारभारावर सकारात्मक दिसून आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या प्रत्येक विभागांच्या आढावा बैठका आता होणार असल्यामुळे एकप्रकारे मागील अनेक वर्षांपासून अधिकारी तसेच खात्यांमध्ये आलेली शिथिलता दूर होईल आणि ते नव्या ऊर्जेने काम करताना दिसतील असा विश्वास वर्तवला जात आहे. आश्विनी भिडे यांच्याकडून मुंबईकरांच्या मोठ्या अपेक्षा असून अधिकाऱ्यांमधील आत्मविश्वास अधिक वाढलेला आहे. या आत्मविश्वासाला या आढावा बैठकीतील प्रत्येक सूचना आणि निर्देशानुसार बळ मिळून अधिकारी मोठ्या विश्वासाने आणि हिंमतीने काम करताना दिसणार आहेत.

Comments
Add Comment