Thursday, April 9, 2026

Shivendrasinhraje Bhonsle : मंत्रालयातील नवीन इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला सविस्तर आढावा

Shivendrasinhraje Bhonsle : मंत्रालयातील नवीन इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला सविस्तर आढावा

मंत्रालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत बांधकामाची सद्यस्थिती, कामाची गती, गुणवत्ता नियंत्रण, सुरक्षितता उपाययोजना तसेच नियोजित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, मुंबई प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके, अधिक्षक अभियंता बडे, यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते व कंत्राटदार उपस्थित होते.

यावेळी मंत्री भोसले यांनी इमारतीचे बांधकाम अत्याधुनिक तांत्रिक निकषांनुसार व दर्जेदार साहित्य वापरून करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश दिले. शासनाच्या वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेता ही इमारत भविष्योन्मुख संकल्पनेतून उभारण्यात येत असून विविध विभागांचे कामकाज एकाच छताखाली अधिक कार्यक्षम पद्धतीने होण्यासाठी याचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इमारतीत प्रशस्त कार्यालयीन जागा, अत्याधुनिक सभागृहे, डिजिटल पायाभूत सुविधा, स्वच्छतागृह, ऊर्जा बचत प्रणाली, अग्निसुरक्षा व्यवस्था तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे मंत्रालयातील कामकाज अधिक गतिमान होऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज कार्यपरिसर उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिकांना विविध विभागांशी संबंधित कामांसाठी अधिक सुटसुटीत व जलद सेवा मिळण्यास मदत होईल, असेही मंत्री भोसले यांनी नमूद केले.

बांधकाम करताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये तसेच कामाची नियमित पाहणी करून टप्प्याटप्प्याने प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालय परिसरातील वाढत्या प्रशासकीय गरजांची पूर्तता करण्याबरोबरच ही नवीन इमारत राज्याच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत भर घालणारी ठरेल. इमारत तयार झाल्यानंतर काही कार्यालये येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. यामुळे सध्या मंत्रालयातील मुख्य तसेच विस्तार इमारती मधील गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >