Thursday, April 9, 2026

Shantecha Karte Chalu Aahe : लक्ष्मीकांत बेर्डेंचं अजरामर विनोदी नाटक, पुन्हा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज

Shantecha Karte Chalu Aahe : लक्ष्मीकांत बेर्डेंचं अजरामर विनोदी नाटक, पुन्हा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज

मुंबई : रंगभूमीवर काही नाटकं प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. यांपैकीच'शांतेचं कार्टं चालू आहे' हे एक गाजलेलं आणि आवडतं नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतणार आहे. काही काळ विश्रांतीनंतर हे नाटक नव्या उत्साहात पुन्हा सादर होत असून, येत्या ११ एप्रिल २०२६ रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर मध्ये त्याचा प्रयोग रंगणार आहे.

'शांतेचं कार्ट चालू आहे' हे लक्ष्मीकांत बेर्डे अभिनीत एक अजरामर मराठी विनोदी नाटक, जे आपल्या अफलातून विनोदी अभिनयासाठी ओळखलं जातं. या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुख्य भूमिका साकारलेली, नयनतारा यांच्यासोबत त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली. अशातच आता हे नाटक रंगभूमीवर पुन्हा परतणार असल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

अमेय विनोद खोपकर सादर करत असलेलं हे नाटक, एव्हीके पिक्चर्स आणि सीजी ग्रुप यांच्या निर्मितीतून साकारलं आहे. दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या नेटक्या दिग्दर्शनातून आणि लेखक श्रीनिवास भणगे यांच्या लेखणीतून उभं राहिलेलं हे नाटक प्रेक्षकांना पोट भरून हसवतानाच जीवनातील नातेसंबंधांवरही भाष्य करतं. संगीतकार अजित परब यांच्या सुरांनी नाटकात अधिकच रंगत आणली असून स्वाती खोपकर, दिनेश खंडागळे आणि निनाद नं बत्तीन या नाटकाचे निर्माते आहेत. यात प्रियदर्शन जाधव, विक्रांत कोळपे, सुकन्या काळण, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, मयुरा रानडे आणि विशाखा सुभेदार यांसारखी लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत.

कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमती-जंमती, गैरसमज आणि आपुलकी यांचा हलकाफुलका वेध या नाटकातून घेतला जातो. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच आपलंसंही वाटतं. पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे, हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहाण्यासारखं आहे.

हास्य आणि भावनांचा समतोल साधणारं 'शांतेचं कार्टं चालू आहे' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नाट्यरसिकांना कुटुंबासोबत हलकंफुलकं आणि दर्जेदार मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >