तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी जीवितहानी झाली असून, या पार्श्वभूमीवर इराणने आक्रमक भूमिका घेत अमेरिकेलाही थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आखाती देशांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
इस्रायलची आक्रमक भूमिका कायम
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये किमान ८९ जणांचा मृत्यू झाला असून ७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींची संख्या मोठी असल्याने रुग्णालयांवर ताण वाढला आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतरही इस्रायलने आपली लष्करी कारवाई सुरूच ठेवली आहे. लेबनॉनमधील लक्ष्यांवर हल्ले करत इस्रायलने आपली आक्रमक भूमिका कायम असल्याचे संकेत दिले आहेत.
अमेरिकेची भूमिका स्पष्ट
इराणचा कडक इशारा
इस्रायलने हल्ले सुरूच ठेवल्यास शस्त्रसंधीतून बाहेर पडण्याचा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या या भूमिकेमुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, इराणने या हल्ल्यांविरोधात आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण कडक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गाने जाणाऱ्या जहाजांना इराणची परवानगी घेणे आवश्यक असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आदेश न पाळणाऱ्या जहाजांवर कारवाई करण्याची धमकीही देण्यात आली आहे. यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमेरिकेने इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या देशांवर ५० टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आर्थिक पातळीवरही तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात ४० दिवसांच्या संघर्षानंतर शस्त्रसंधी झाली असली, तरी ती फक्त दोन आठवड्यांसाठी मर्यादित आहे. दरम्यान काही ठिकाणी पुन्हा हल्ल्यांच्या घटना घडल्याने ही शस्त्रसंधी टिकणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.






