बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील अतिक्रमणाचा डाव हाणून पडला
महानगरपालिका आणि उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांची संयुक्त कारवाई
एकाच दिवशी १४४ झोपड्या पाडण्याची मुंबईच्या इतिहासातील पहिली घटना
मुंबई : मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा सफाया करण्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले असून मानखुर्द मधील मोकळ्या भूखंडावर एक विशिष्ट समाजाच्या लोकांनी अतिक्रमण करून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या भूखंडावरील तब्बल चौदाशे झोपड्यांवर महापालिकेने कारवाई करून हा भूखंड मोकळा केला. या माध्यमातून एका विशिष्ट समाजाकडून होत असलेला हा प्रयत्न उत्तर प्रदेश पॅटर्न नुसार हाणून पडण्यात महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला यश आले आहे. एकाच दिवशी चौदाशे झोपड्यांवर कारवाई करणे हे मुंबई महापालिका इतिहासातील आजवरची मोठी घटना आहे.
घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) या शासकीय जागेवरील १४०० अनधिकृत झोपड्यांचे बुधवारी ८ एप्रिल २०२६ रोजी बुलडोझर चढवून कारवाई करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचे ‘एम पूर्व’ प्रशासकीय विभाग आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ५० अन्वये घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) या शासकीय जागेवरील झोपड्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) पूर्व उपनगरे यांनी निर्देशित केले होते.






