फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या अमेरिका - इस्त्रायल आणि इराण (Iran-US-Israel War) या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हवाई हल्ले केले. त्यात इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर प्रचंड नुकसान झालं. त्याच्या प्रत्युत्तरात इराणने अमेरिकेच्या तळांवर, इस्रायलवर आणि मध्यपूर्वेतील इतर देशांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले. या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्व देश पेटून उठले.
आयडीएफने (इस्त्रायल डिफेन्स फोर्स) सांगितले की, बेरूतमधील तल्लेत खयात परिसरात, हिज्बुल्लाहचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दाहियेह भागाबाहेर अली युसुफ हर्षी याला लक्ष्य करण्यात आले. समोर आलेल्या फुटेजमध्ये या हल्ल्यामुळे एक बहुमजली इमारत अंशतः कोसळल्याचे दिसून आले. सैन्याच्या माहितीनुसार, हर्षी हा कासिम यांचा पुतण्या आणि वैयक्तिक सचिव होता. (Iran-US-Israel War)
सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “हर्षी हा हिज्बुल्लाहचे महासचिव नईम कासिम यांचा निकटवर्तीय सहकारी आणि वैयक्तिक सल्लागार होता. त्यांच्या कार्यालयाचे तसेच सुरक्षेचे व्यवस्थापन करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.”
त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की, एकीकडे युद्धविराम जरी जाहीर करण्यात आला असला तरीही लेबनॉन आणि हेजबोलावरील हल्ले (Iran-US-Israel War) मात्र अजूनही सुरूच आहेत. अमेरिकेने स्पष्ट केलं आहे की जर करार पाळला गेला नाही, तर ते पुन्हा मोठा हल्ला करू शकतात. तर इराणही मागे हटायला तयार नाही.