प्रकल्प कामात रस्ते सुरक्षेसह पर्यावरण आणि आरोग्याचा मुद्दा बनतो जटील
मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव मुलंड लिंक रोडच्या कामांमध्ये गोरेगाव परिसरात कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन केले जात असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी या प्रकल्प कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास तसेच गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम करताना जनतेला कोणताही त्रास होवू नये याची काळजी घेण्यात यावी अशी सूचना करत भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी अशाप्रकारे कंत्राटदारांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली. त्यामुळे या कामांबाबत सदस्याने उपस्थित केलेला मुद्दा महत्वाचा असून त्यांच्या सर्व मुद्दयांची माहिती पुढील बैठकीत सादर करत त्यांचा हरकतीचा मुद्दा समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी राखून ठेवला.






