मुंबई : अनेक वर्षांपासून काही दिग्गज व्यक्तींच्या आयुष्यावर बायोपिक बनवले जातायत. यामध्ये खेळाडू, सिनेइंडस्ट्रीतील कलाकार, राजकारणी नेते, तसेच अध्यात्मिक गुरू यांचे बायोपिक चर्चेचा विषय ठरले आता. अशातच आता एका भारतीय संताची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर येणार असून या सिनेमात अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिका साकारणार आहे.
बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि डॉ. काशिनाथ घाणेकर अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वांना रुपेरी पडद्यावर जिवंत केल्यानंतर, सुबोध भावे आता एका भारतीय संताची जीवनगाथा मांडण्यासाठी सज्ज झाला आहे. ' श्री बाबा नीम करोली महाराज 'असं या आगामी हिंदी सिनेमाचं नाव असून, नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
'श्री बाबा नीम करोली महाराज' हा सिनेमा २० व्या शतकातील सर्वात प्रभावशाली संतांपैकी एक मानल्या जाणाऱ्या 'नीम करोली बाबां'च्या जीवनावर आधारित आहे. बाबांचा जन्म, त्यांचं आध्यात्मिक कार्य आणि १९७३ मध्ये त्यांनी घेतलेली महासमाधी, असा त्यांचा संपूर्ण प्रवास या सिनेमात उलगडला जाणार आहे.
दिग्दर्शक शरद सिंग ठाकूर यांनी बाबांच्या कुटुंबाकडून अधिकृत परवानगी घेऊन आणि सखोल संशोधन करून हा सिनेमा साकारला आहे.
या सिनेमात अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत झळकणार असून, त्याच्यासोबत हितेन तेजवानी, मिलिंद गुणाजी, समीक्षा भटनागर आणि स्मिता तांबे यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
सिनेमाच्या टीझरमध्ये सुबोध भावे नीम करोली बाबांच्या वेशभूषेत दिसत असून कपाळावर टिळा, अंगावर घोंगडी आणि चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता असलेला त्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. "बाबांची भूमिका साकारणं हे माझं भाग्य आहे," अशी भावना सुबोधनं व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
नीम करोली बाबा हे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग आणि प्रसिद्ध अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स हे देखील बाबांच्या विचारांनी प्रेरित होते. उत्तराखंडमधील 'कैंची धाम' इथं त्यांचं मुख्य आश्रम आहे, जिथं आजही लाखो भाविक दर्शनासाठी जातात. तर, क्रिकेटपटू विराट कोहली देखील अनेकदा नीम करोली बाबा यांच्या आश्रमात दर्शनसाठी जात असतो.
माहितीनुसार, हा सिनेमा येत्या २४ एप्रिल २०२६ रोजी जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता सुबोध भावेचा हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.






