मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संघटनबांधणीचा नवा टप्पा आकार घेत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब आणि उच्चविद्याविभुषित तसेच तीन टर्म लोकसभा निवडणूकीत प्रचंड मताधिक्याने जनतेने जिंकवून दिलेले युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने महाराष्ट्र राज्यात घराघरात व शेवटचा घटक असलेल्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. विशेषतः Mumbai Metropolitan Region (एमएमआर) हा या रणनीतीचा केंद्रबिंदू ठरत आहे.
मुंबई व एमएमआर रीजन हा केवळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग नसून, तो सामाजिक आणि भाषिक विविधतेने नटलेला प्रदेश आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली अशा शहरांमध्ये मराठीसोबत हिंदी, गुजराती, उर्दू, दक्षिण भारतीय भाषिक आणि इतर अनेक समाजघटक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या बहुभाषिक मतदारसंघात प्रभावी संवाद साधणे हे कोणत्याही पक्षासाठी मोठे आव्हान असते. शिवसेनेने याच वास्तवाचा स्वीकार करून बहुभाषिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब सुरू केला आहे.
याचबरोबर “जे काम करतील तेच टिकतील” हा संदेश सुद्धा पक्ष संघटनेत स्पष्टपणे दिला जात आहे. वेळ पडल्यास कामचुकारांना डच्चू देण्याची भूमिका ही संघटनेत शिस्त आणि कार्यक्षमतेला चालना देणारी असेल असेही समजते. या प्रक्रियेमुळे निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी मिळेल, तर निष्क्रियतेचे प्रमाण आपोआप कमी होईल असे दिसतेय.
देशातील व राज्यातील २०२९ ला होणा-या आगामी सार्वत्रिक निवडणुका आणि संभाव्य मतदारसंघ पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण रणनीती अत्यंत महत्त्वाची ठरतेच परंतु सूक्ष्म पातळीवरील नियोजन, बहुभाषिक मतदारांशी संवाद, सक्षम युवा नेतृत्व आणि ठोस विकासकामांची जोड या सर्व घटकांच्या आधारे शिवसेना एमएमआरमध्ये आपली ताकद अधिक भक्कम करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे हे वास्तविक रूपात दिसून येत आहे.
एकूणच, मजबूत संघटना, बहुविध समाजघटकांशी सुसंवाद आणि कार्यक्षम नेतृत्व या त्रिसूत्रीवर उभा असलेला हा प्रयत्न यशस्वी ठरताना, जनतेचा विश्वास आणि मतदारांचा पाठिंबा निश्चितच अधिक दृढ होईल यात शंका येण्याचे कारण नाही. आगामी काळात या रणनीतीची खरी परीक्षा लागणार असली, तरी सध्या तरी पक्षाने सक्रिय कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करत योग्य दिशेने पाऊल टाकल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.






