सातारा : नियतीचा क्रूर खेळ आणि साताऱ्याच्या लेकीने दिलेला लढा, अखेर दुर्दैवाने संपला आहे. कराड तालुक्यातील उंब्रज (वडगाव) येथील रहिवासी नीलम तानाजी शिंदे यांचे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. गेल्या १३ महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या नीलमने २८ मार्च २०२६ रोजी अखेरचा श्वास घेतला. या बातमीमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यासह उंब्रज परिसरात शोककळा पसरली आहे. उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त अमेरिकेत असलेल्या नीलम शिंदे यांचा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सॅक्रामेंटो येथे सायंकाळी ७:३० च्या सुमारास भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या मेंदूला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने 'युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया' येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघाताच्या दिवसापासूनच नीलम कोमात गेल्या होत्या. गेल्या सव्वा वर्षांपासून नीलम यांच्यावर अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. त्या कोमातून बाहेर येतील आणि पुन्हा साताऱ्याच्या मातीत परततील, अशी आशा त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला होती. तब्बल १ वर्ष २७ दिवस त्यांनी मृत्यूला झुंज दिली, मात्र प्रकृतीत कोणतीही अपेक्षित सुधारणा होऊ शकली नाही. अखेर २८ मार्च रोजी उपचारादरम्यान त्यांच्या शरीराने साथ सोडली.
मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात मोठे बदल ...
नेमकं काय घडलं नीलम सोबत ?
अवयव दानाचा निर्णय
नीलम अपघात झाल्यापासून कोमातच होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. तब्बल 1 वर्ष 27 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या नीलमने अखेरचा श्वास घेतला. नीलमच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिचे डोळे आणि त्वचा (स्कीन) दान करण्यात आली आहे. त्यामुळे इतरांना नवजीवन मिळणार आहे. तिच्यावर आज 07 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता (अमेरिकन वेळेनुसार) Mount Vernon Memorial Park येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नीलमवर अंत्यसंस्कार होत असताना आखाती देशातील युध्दामुळे तिचे वडील आणि कुटुंबीय अमेरिकेत उपस्थित राहू शकत नाहीत. तर अमेरिकेत स्थायिक असलेली नीलमची आत्या सर्व विधी पार पाडणार आहे.
अमेरिकेत अवयवदान, आज होणार अंत्यसंस्कार
१४ फेब्रुवारी २०२५ पासून कोमात असलेल्या नीलमला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, २८ मार्च २०२६ रोजी तिची झुंज अपयशी ठरली. दुःखाच्या या डोंगराखाली दबलेले असतानाही, शिंदे कुटुंबाने सामाजिक भान जपत नीलमचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिचे डोळे आणि त्वचा (Skin) दान करण्यात आली आहे. तिच्या या दानामुळे अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश येणार असून, गरजू रुग्णांना त्वचा प्रत्यारोपणासाठी मदत होणार आहे. नीलमवर आज, ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजता (अमेरिकन वेळेनुसार) कॅलिफोर्नियातील 'माउंट व्हरनॉन मेमोरियल पार्क' (Mount Vernon Memorial Park) येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासातील तांत्रिक अडचणींमुळे नीलमचे वडील तानाजी शिंदे आणि इतर जवळचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेत पोहोचू शकले नाहीत. मुलीचे शेवटचे दर्शन घेता न आल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नीलमची अमेरिकेत स्थायिक असलेली आत्या तिथे उपस्थित राहून सर्व धार्मिक विधी पार पाडणार आहे.
नीलमच्या मामांनी व्यक्त केल्या भावना
नीलमच्या मामांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अत्यंत जड अंतःकरणाने गेल्या १४ महिन्यांचा थरार आणि कुटुंबाची हतबलता व्यक्त केली. "डोळे उघडून ती बघायची, पण ओळखत कोणालाच नव्हती," अशा शब्दांत त्यांनी नीलमच्या कोमातील स्थितीचे वर्णन केले. नीलमच्या मामांनी सांगितले की, गेल्या १४ महिन्यांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. तिच्या शरीराच्या इतर जखमा भरून निघाल्या होत्या. "तिच्या दोन्ही हातांना आणि पायांना झालेली गंभीर दुखापत उपचारांनंतर बरी झाली होती, परंतु मेंदूची रिकव्हरी होऊ शकली नाही. ती डोळे उघडायची, समोर पाहायची पण प्रत्यक्षात तिला काहीच समजत नव्हते. आम्हाला वाटलं होतं की एवढे दिवस उपचार सुरू आहेत, तर कुठेतरी चमत्कार होईल आणि ती परत येईल. पण दुर्दैवाने २८ मार्च रोजी तो निरोप आला ज्याची आम्हाला भीती होती." नीलमचे वडील आपल्या लेकीला अखेरचे पाहण्यासाठी अमेरिकेला जाण्यासाठी धडपडत होते. मात्र, आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे विमान प्रवासात मोठे अडथळे निर्माण झाले. तिकीट मिळवण्यासाठी कुटुंबाने शर्थीचे प्रयत्न केले, पण तिकीट उपलब्ध होऊ शकले नाही. लाडक्या लेकीचे शेवटचे दर्शन घेता न आल्याने वडील तानाजी शिंदे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. "अमेरिकन प्रशासनाने आम्हाला या काळात मोठी मदत केली. तिथे तिचे उपचार अतिशय उत्तम रुग्णालयात सुरू होते. दर आठवड्याला तिथून फोन यायचा आणि नीलमच्या प्रकृतीची सविस्तर माहिती दिली जायची. डॉक्टर आणि तिथल्या यंत्रणेने तिला वाचवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती," असेही मामांनी आवर्जून नमूद केले
अत्यंत हुशार आणि जिद्दी असलेल्या नीलमने अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत म्हणजेच 'नासा'मध्ये (NASA) शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) पूर्ण केली होती. शैक्षणिक जीवनात नेहमीच अव्वल राहणाऱ्या या कन्येचा लढा अखेर संपला असून, तिच्या जाण्याने साताऱ्याचे एक उज्वल रत्न हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. १४ महिन्यांच्या प्रदीर्घ उपचारांनंतर नीलमच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होईल, अशी आशा कुटुंबाला होती. मात्र, २६ मार्च रोजी अचानक तिच्या फुफ्फुसात संसर्ग (Infection) झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हा संसर्ग इतका तीव्र होता की, आधीच कमकुवत झालेल्या शरीराला तो झेपला नाही आणि २८ मार्च रोजी तिची प्राणज्योत मालवली. नीलमचा अपघात झाला तेव्हा तिचे वडील आणि भाऊ तातडीने अमेरिकेला गेले होते. तिथे आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि प्रकृती स्थिर असल्याची चिन्हे दिसल्यानंतर दोन महिन्यांनी ते भारतात परतले होते. सुदैवाने, नीलमची आत्या तिथेच वास्तव्यास असून त्यांच्याकडे 'ग्रीन कार्ड' असल्याने त्यांनी या संपूर्ण काळात नीलमची काळजी घेतली. आताही कुटुंबाच्या अनुपस्थितीत त्या सर्व अंतिम विधी पार पाडत आहेत. नीलमच्या मामांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "नीलम अतिशय बुद्धिमान होती, तिने कधीही पहिला क्रमांक सोडला नव्हता. नासासारख्या संस्थेत काम करण्याचे तिचे स्वप्न साकार झाले होते, मात्र नियतीने घात केला. ती आता आमच्यात नसली, तरी आम्ही तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या डोळ्यांच्या रूपाने नीलम जगाकडे बघेल आणि कोणाचे तरी आयुष्य उजळवेल, याच समाधानात आम्ही आहोत."





