मुंबई : आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र कोणत्याही परिस्थितीत अवैध उत्खनन होणार नाही याची काटेकोर खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
रायगड जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन अंतर्गत मौजे श्रीवर्धन मतदारसंघातील दगडखाणींसंदर्भात महसूलमंत्री दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, रायगडचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
उत्खननाला परवानगी देतानाच महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला अवैध प्रकारांबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला. "जेवढा परवाना दिला आहे, तेवढ्याच मर्यादेत उत्खनन होत आहे का, याची काटेकोर पडताळणी करावी. कोणत्याही परिस्थितीत अवैध उत्खनन होणार नाही, याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी," असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.






