Wednesday, April 8, 2026

Prasad Oak : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रसाद ओकच्या नव्या लूकची चर्चा, लवकरच झळकणार 'या' भूमिकेत

Prasad Oak  : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रसाद ओकच्या नव्या लूकची चर्चा, लवकरच झळकणार 'या' भूमिकेत

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सध्याच्या भागांमध्ये प्रेक्षकांना प्रसाद ओक एका वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळतोय. कधी डोक्यावर टोपी, तर कधी रंगीत रुमाल बांधून तो प्रहसनांचा आस्वाद घेताना दिसतो आणि कलाकारांना मनापासून दाद देतो. पण, प्रसादच्या या बदललेल्या स्टाइलमागचं कारण काय? हा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून ही केवळ फॅशन नसून, एका मोठ्या भूमिकेची तयारी आहे. अभिनेता प्रसाद ओक सध्या ' खंजिरीचे बोल ' या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या सिनेमात प्रसाद राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेशी पूर्णतः एकरूप होण्यासाठी प्रसादनं टक्कल केलं आहे त्याचा हा लूक लपवण्यासाठीच तो कार्यक्रमात टोपी किंवा रुमालाचा वापर करत असल्याचं दिसतंय. त्याच्या या समर्पणातून त्याची भूमिकेप्रति असलेली निष्ठा ठळकपणे दिसून येते.

'खंजिरीचे बोल' सिनेमाचा मुहूर्त अलीकडेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाला. या सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन करत आहेत. 'खंजिरीचे बोल' सिनेमा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित असून, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, समाज प्रबोधन आणि राष्ट्रभक्तीचा संदेश या सिनेमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या सिनेमासाठी संशोधन आणि लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केलं असून संगीत कौशल इनामदार यांनी दिलं आहे. तर संतोष फुटाणे यांनी सिनेमाचं कला दिग्दर्शन केलं आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र सिनेमा, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) निर्मित, या सिनेमाची सहनिर्मिती शिवम यादव आणि कार्तिकी यादव करत आहेत. प्रसाद ओकच्या या नव्या लूकमुळे आणि उत्तम विषयामुळे 'खंजिरीचे बोल' सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >