Wednesday, April 8, 2026

Dombivli News : एकाने डोळे झाकले, दुसरा रील काढत होता अन् तिसरा...मोठागाव-माणकोली पुलावर स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या

Dombivli News : एकाने डोळे झाकले, दुसरा रील काढत होता अन् तिसरा...मोठागाव-माणकोली पुलावर स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या

डोंबिवली : स्टंटबाजी आणि रिल्सच्या नादात स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणांना आता पोलिसांचा दणका बसला आहे. ठाणे-डोंबिवलीला जोडणाऱ्या माणकोली उड्डाणपुलावर चक्क डोळे झाकून दुचाकी चालवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. माणकोली उड्डाणपूल सध्या स्टंटबाजांचा अड्डा बनला असल्याचे चित्र आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण भरधाव दुचाकी चालवत असताना, त्याच्या मागे बसलेल्या दुसऱ्या तरुणाने चक्क त्याचे दोन्ही डोळे हाताने झाकले आहेत. रस्ता दिसत नसतानाही केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा तरुण बेधडकपणे गाडी चालवत असल्याचे पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या स्टंटबाजीमुळे उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनधारकांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला होता. या प्रकाराची दखल घेत विष्णूनगर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली आणि गणेश फोंडा रेड्डी, कबीर नेतकर आणि यश मालवणकर या २२ वर्षीय तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. रिल्सच्या वेडापायी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी या कारवाईतून कडक इशारा दिला आहे.

मोठागाव-माणकोली पूल बनतोय स्टंटबाजांचे रणांगण

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला मोठागाव-माणकोली उड्डाणपूल पुन्हा एकदा चुकीच्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'धुरंधर' चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे प्रकाशझोतात आलेल्या या पुलावर आता नशेखोर आणि जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा सुळसुळाट वाढला आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात नशेखोरांनी उच्छाद मांडला होता, ज्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली होती. मात्र, हे सत्र तिथेच थांबलेले नाही. आता भिवंडी परिसरातील काही तरुण या पुलावर आलिशान चारचाकी गाड्या घेऊन येतात आणि भरधाव वेगात स्टंटबाजी करत असल्याचे समोर आले आहे. भाजप नेते दीपेश म्हात्रे यांनी या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत प्रशासनाचे लक्ष वेधले. म्हात्रे यांच्या ट्विटनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत स्टंटबाजांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, पुलावर कायमस्वरूपी सुरक्षेची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तरुण पिढी कोणत्या थराला जाऊ शकते, याचा संतापजनक नमुना माणकोली उड्डाणपुलावर पाहायला मिळाला. वाहतूक पोलिसांनी अनेकदा दंडात्मक कारवाई करूनही स्टंटबाजांची दहशत कमी झालेली नाही. आता तर चक्क 'डोळे झाकून' भरधाव दुचाकी चालवण्याचा एक जीवघेणा व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका दुचाकीवर तीन तरुण बसलेले दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचे डोळे त्याच्या मागे बसलेल्या मित्राने दोन्ही हातांनी घट्ट झाकले आहेत. रस्ता दिसत नसतानाही हा चालक मोठ्या रहदारीच्या पुलावर बिनधास्तपणे गाडी पळवत आहे, तर मागे बसलेला तिसरा तरुण या संपूर्ण 'मृत्यूपंथा'चे चित्रीकरण करण्यात मग्न आहे. पुलावर इतर वाहनांची वर्दळ सुरू असतानाही, केवळ रिल्स बनवण्यासाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या स्टंटबाजांविरोधात आता कडक कारवाईची मागणी होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >