नवी मुंबई : आपत्ती काळात नागरिकांचे संरक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या 'नागरी संरक्षण दल' (Civil Defence) वतीने नवी मुंबईत एका विशेष 'मॉकड्रिल'चे (प्रात्यक्षिक सराव) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी नागरी संरक्षण दलाला नवी मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य लाभणार आहे.
या सरावामध्ये केवळ नागरी संरक्षण दलच नाही, तर विविध शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग असणार आहे. यामध्ये विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, होमगार्ड्स आणि स्वयंसेवक, T.D.R.F. (ठाणे आपत्ती प्रतिसाद दल) आणि N.D.R.F. (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल), पोलीस प्रशासन, प्रसारमाध्यमे याशिवाय परिसरातील मान्यवर देखील या मोहिमेचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
बोनकोडे आणि कोपरखैरणे परिसरातील नागरिकांनी या सरावामुळे गोंधळून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच या राष्ट्रीय उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन उपनियंत्रक, नागरी संरक्षण (नवी मुंबई समूह) विजय ब. जाधव यांनी केले आहे.






