डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
वॉशिंग्टन : गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये धुमसणारा संघर्ष अखेर शांत झाला असून दोन्ही देशांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी (Ceasefire) करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर आणि जागतिक दबावानंतर हा महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळाला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजेपर्यंत इराणला अल्टिमेटम दिला होता. जर इराणने लष्करी कारवाया थांबवल्या नाहीत, तर त्यांच्या वीज प्रकल्पांवर (Power Plants) भीषण हल्ले करून देशाला उद्ध्वस्त करू, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. मात्र, ही मुदत संपण्यापूर्वीच दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि लष्करी कारवाया दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या 'सशर्त' शस्त्रसंधीमुळे आखाती देशांमधील युद्धाचे सावट काहीसे कमी झाले असून, पुढील १४ दिवस दोन्ही देश राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. ट्रम्प यांनी स्वतः या शस्त्रसंधीची घोषणा केली असून, इराणने देखील आपल्या सैन्य हालचाली थांबवण्याचे मान्य केले आहे.
गेल्या काही तासांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये अखेर दोन आठवड्यांचा युद्धविराम (Ceasefire) जाहीर झाला आहे. इराणने दिलेला १० अटींचा प्रस्ताव मान्य करण्यासारखा असल्याचे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीवर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, इराणवर भीषण हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर काही वेळातच ट्रम्प यांनी ही नरमाईची भूमिका घेतल्याने जागतिक स्तरावर आश्चर्य व्यक्त होत आहे. या करारात अमेरिकेने इराणसमोर 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) पूर्णपणे खुली करण्याची महत्त्वाची अट ठेवली होती. जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या या मार्गाबाबत इराणने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, हा मार्ग तातडीने खुला करण्यास संमती दिली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, जर अमेरिकेने हल्ले थांबवले तर इराणही युद्ध मागे घेण्यास तयार आहे. या मोठ्या तणावात पाकिस्तानने महत्त्वाची मध्यस्थी केल्याचे समोर आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पाकिस्तानच्या भूमिकेचा उल्लेख केला. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांचे आभार मानले आहेत. या मध्यस्थीमुळेच दोन्ही देश चर्चेच्या टेबलावर येणे शक्य झाले. पुढील दोन आठवडे दोन्ही देशांचे सैन्य कोणत्याही आक्रमक कारवाया करणार नाहीत. या काळात राजनैतिक चर्चा करून हा वाद कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गुवाहाटी : आयपीएलच्या १९ व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) आपला दबदबा कायम राखला आहे. मंगळवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत राजस्थानने बलाढ्य मुंबई ...
काय काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ?
कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सज्ज
"मध्य-पूर्वेतील राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करत असताना या जुन्या आणि जटिल समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे हा माझा मोठा सन्मान आहे," अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली भावना व्यक्त केली. जागतिक तणाव कमी करण्यासाठी त्यांनी दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केला असून, या कालावधीत दोन्ही देशांमधील वादावर राजनैतिक चर्चा केली जाणार आहे. या निर्णयामुळे केवळ अमेरिका आणि इराणमधील संघर्षच थांबणार नाही, तर संपूर्ण मध्य-पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठी गती मिळणार आहे.
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी काय म्हणाले?
अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम लागू झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. या शस्त्रसंधीला त्यांनी इराणचा मोठा 'नैतिक आणि लष्करी विजय' म्हणून संबोधित केले आहे. अमेरिकेला इराणच्या १० अटी मान्य करण्यास भाग पाडणे, हा इराणच्या कणखर भूमिकेचा विजय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोजतबा खामेनी यांनीच इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेने तयार केलेल्या शस्त्रसंधी प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुढील दोन आठवडे दोन्ही देशांमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, या अंतिम करारासाठी होणारी महत्त्वाची चर्चा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे पार पडणार असल्याचेही खामेनी यांनी नमूद केले. इराणच्या मते, हा युद्धविराम केवळ तात्पुरता नसून, अमेरिकेला त्यांच्या विनाशकारी धोरणांपासून मागे हटवण्यास लावलेला हा एक यशस्वी प्रयत्न आहे. "आम्ही आमच्या अटींवर शांततेसाठी तयार आहोत," असा स्पष्ट संदेश मोजतबा खामेनी यांनी या निमित्ताने जागतिक समुदायाला दिला आहे.






