महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले निर्देश
मुंबईतील मिठी नदीसह नाल्यांची भिडे यांनी केली पाहणी
मुंबई : मिठी नदीच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रात तसेच मुंबईतील लहान, मोठे नाल्यांमध्ये ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते, अशा ठिकाणांना नजरेसमोर ठेवून त्या परिसरातील कचरा आणि नाल्यांमधील गाळ प्राधान्याने काढावा. या कामासाठी कालबद्ध नियोजन करून ३१ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील नालेस्वच्छता १०० टक्के पूर्ण केली जाईल, याची दक्षता घ्यावी. यासोबतच मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांवरील मनुष्य प्रवेशिका किंवा ढाप्यांचीही तपासणी करा, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील नाले आणि नद्या यातून गाळ उपसा करून स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील नाला स्वच्छतेबरोबरच मिठी नदीवर सुरू असलेल्या तीन पॅकेज अंतर्गत सहा ठिकाणी कामांची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए कार्यालयाजवळील जेतवन उद्यान येथे मिठी नदी, वरळीतील (जी दक्षिण) नेहरू विज्ञान केंद्र नाला, दादर धारावी नाला (जी उत्तर) येथे सुरू असलेल्या स्वच्छता कामांची बुधवारी ८ एप्रिल २०२६ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) कल्पना राऊळ, उप प्रमुख अभियंता संजय इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
येत्या ३१ मे २०२६ पर्यंत नालेसफाईचे काम १०० टक्के पूर्ण करा
मेट्रो आणि रेल्वे विभागाने समन्वय साधावा
वरळी नाका तसेच संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) परिसरामध्ये पाणी साचण्याची सखल ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी मेट्रो तसेच रस्ते विभाग यांच्या समन्वयाने पावसाळी जलवाहिनीला संलग्न असणाऱ्या जोडण्या सुस्थितीत राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
नाल्याच्या भिंतीचे काम विनाविलंब करा
दादर धारावी नाला येथे महानगरपालिका आयुक्त भिडे यांनी भेट दिली. यावेळी माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, दादर धारावी नाल्यात नागरिकांकडून फेकला जाणारा तरंगता कचरा ही मोठी समस्या आहे. अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक वेळा नाले स्वच्छता करणे अपेक्षित आहे. या नाल्याच्यावरील भागात काही ठिकाणी भिंत खचली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना धोका निर्माण होवू शकतो. तरी संबंधित प्रभाग अधिकारी तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभागाने समन्वयाने भिंतीच्या दुरुस्तीचे काम विनाविलंब करावे. शहरामध्ये ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये नागरिकांकडून कचरा फेकला जाण्याची समस्या आहे, अशा नाल्यांना जाळ्या बसविण्याचा उपक्रम हाती घ्यावा, जेणेकरून नाल्यांमध्ये कचरा फेकले जाण्यापासून प्रतिबंध होवू शकेल, असे निर्देश भिडे यांनी दिले.
मिठी नदीचा गाळ काढण्याच्या गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांनी आग्रही रहावे
मिठी नदीच्या तीनही पॅकेजमध्ये नालेस्वच्छतेची सहा ठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांची पॅकेजनिहाय माहिती महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी घेतली. पॅकेजनिहाय उर्वरित कालावधीचे नियोजन, किती वाहने तसेच यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे, अपेक्षित गतीने काम करण्यासाठी त्यामध्ये किती वाढ होणे अपेक्षित आहे, याचा आढावा घेवून कामाची गती वाढविण्यासाठी आवश्यक त्या बाबी कराव्यात, अशा सूचना भिडे यांनी दिल्या.






