Wednesday, April 8, 2026

Attack on Iran's Lavan Island oil refinery : युद्धविरामानंतर काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

Attack on Iran's Lavan Island oil refinery : युद्धविरामानंतर काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

तेहरान : युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी सरकारी दूरदर्शनच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. अहवालानुसार, अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र हा हल्ला नेमका कुणाकडून करण्यात आला, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) देखील सांगितले की, इराणकडून येणाऱ्या क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर देताना त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने गोळीबार केला. युद्धविराम लागू असतानाही इराणने कुवैतमध्ये ड्रोन हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात तेल आणि वीज क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

कुवैतच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल सऊद अब्दुलअजीज अल-ओतैबी यांनी सांगितले की, पहाटे पाच वाजल्यानंतर इराणचे 28 ड्रोन पाडण्यात आले. त्यांनी हा हल्ला शत्रूकडून करण्यात आलेला मोठा आणि भीतीदायक हल्ला असल्याचे म्हटले. मोठ्या संख्येने ड्रोन पाठवण्यात आले होते, मात्र हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना रोखले. काही ड्रोन देशाच्या दक्षिण भागातील तेल प्रकल्प आणि वीज निर्मिती केंद्रांच्या दिशेने जात होते, असा दावा त्यांनी केला. या हल्ल्यांमुळे तेल संरचना, वीज केंद्रे आणि पाणी प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत इराणला कठोर इशारे देत असतानाच हा करार झाला. तीन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी कठोर शब्दांत इशारा देत म्हटले होते की, जर तेहरानने होर्मुज सामुद्रधुनी खुली केली नाही आणि अमेरिकेसोबत करार केला नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतील.

ट्रम्प यांनी इशारा देताना सांगितले होते की, 7 एप्रिल रात्री 8 वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार 8 एप्रिल सकाळी 5.30 वाजता) युद्ध सुरू होऊ शकते आणि अशा परिस्थितीत अमेरिका इराणमधील ऊर्जा प्रकल्प (पॉवर प्लांट्स) आणि पूल यांना लक्ष्य करेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >