Tuesday, April 7, 2026

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार  उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे. त्यामुळे मीरा भाईंदर वासियांचा प्रवास आता लवकरच गारेगार आणि जलद , सुलभ होण्याची शक्यता आहे. तसेच पॉड टॅक्सिचे देखील भूमिपूजन करण्यात येणार आहे.

मेट्रो ९ चे महत्व आणि कनेक्टिव्हिटी

मेट्रो लाईन ९ ही मुंबई मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाची मेट्रो लाईन मानली जात आहे. दहिसर ते काशिगाव दरम्यान धावणारी ही लाईन मेट्रो लाईन ७ शी जोडली गेल्यामुळे प्रवाशांना थेट अंधेरीपर्यंत प्रवास करता येणार आहे. यामुळे उपनगर आणि शहर यांतील अंतर कमी होऊन रोजच्या प्रवासाला मोठी गती मिळणार आहे.

मार्ग आणि स्थानकांची माहिती

या मेट्रो मार्गावर दहिसर, पांडुरंग वाडी, मीरा गाव आणि काशिगाव अशी प्रमुख स्थानके असणार आहेत. या स्थानकांमुळे मीरा-भाईंदर परिसरातील रहिवाशांना सहजपणे मेट्रो सेवा उपलब्ध होईल.

मेट्रोमधील सुविधा

ही संपूर्ण लाईन एलिव्हेटेड स्वरूपात असून, प्रवाशांसाठी आधुनिक वातानुकूलित डबे उपलब्ध असतील. याशिवाय स्मार्ट कार्ड आणि QR कोड तिकीट सुविधा देण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली असून, प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.

लाईन ७ आणि लाईन ९ संयुक्त कॉरिडॉर

मेट्रो लाईन ७ आणि लाईन ९ या एकत्रितपणे कार्यरत राहणार असून, गुंदवली ते काशिगाव असा संयुक्त कॉरिडॉर तयार झाला आहे. यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा-भाईंदर दरम्यान थेट प्रवास शक्य होणार आहे. लाईन ७ आता विस्तारित स्वरूपात अधिक प्रभावीपणे चालवली जाणार आहे.

वेळापत्रक आणि सेवा 

मेट्रो ची पहिली गाडी : ५.५० वाजता सुटणार

शेवटची गाडी : रात्री ११ वाजेपर्यंत धावेल

गर्दीच्या वेळेत ५ ते ६ मिनिटांच्या अंतराने गाड्या उपलब्ध असतील

इतर वेळेत ८ ते १० मिनिटांचा फरक असेल

आठवड्याच्या दिवसांत २७६ फेऱ्या, शनिवारी २२३ आणि रविवारी २०५ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

प्रवास वेळेत मोठी बचत

सध्या दहिसर ते काशिगाव हा प्रवास रस्त्याने साधारण ३० ते ४५ मिनिटांचा होतो. मात्र मेट्रो सुरू झाल्यानंतर हा प्रवास केवळ १० ते १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळून प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

पर्यावरण आणि विकासावर परिणाम

या प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन प्रदूषणात घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच मीरा-भाईंदर परिसरातील विकासाला चालना मिळून रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >