अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा (Iran-US-Israel War) आजचा ३९ वा दिवस आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली. अमेरिकेने ठरवलं तर इराणला एका रात्रीत नष्ट करु शकतो आणि ही कारवाई आज रात्रीसुद्धा होऊ शकते. हे युद्ध सध्या अमेरिकेच्या इच्छेनुसार लढलं जातंय आणि अमेरिकेकडे कमी वेळात मोठं नुकसान करण्याची शक्ती आहे, असं म्हणताच दुसरीकडे अमेरिका - इस्रायलकडून इराणच्या १७ निवासी भागांवर बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत.
खोर्रमाबाद विमानतळाला लक्ष्य :
अमेरिका-इस्रायलकडून आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये खोर्रमाबाद विमानतळाला लक्ष्य करण्यात आले आहे. दरम्यान, इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणी नागरिकांना इशारा देत रेल्वेगाड्या आणि रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. फारसी भाषेत जारी केलेल्या संदेशात इस्रायलने म्हटले की, असे न केल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच इराणच्या अल्बोर्ज प्रांतावर झालेल्या अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १८ जणांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
निःशस्त्र नागरिकांवर हल्ला :
इराणी रेड क्रेसेंट संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील १७ निवासी भागांवर बॉम्बहल्ले केले. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये संघटनेने म्हटले, “नागरिकांवर हल्ला करण्याचे कोणतेही औचित्य नाही. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदे स्पष्टपणे सांगतात की निःशस्त्र नागरिकांवर हल्ला करणे हा युद्धगुन्हा आहे.”
मध्य इस्रायलचे मोठे नुकसान :
दरम्यान, इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रभर चाललेल्या अमेरिकन-इस्रायली हल्ल्यांमध्ये १५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागली. इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे मध्य इस्रायलमध्ये मोठे नुकसान झाले, मात्र अनेक क्षेपणास्त्रे हवेतच पाडल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलच्या बचाव सेवांच्या हवाल्याने सांगितले की हे नुकसान इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमधून डागण्यात आलेल्या क्लस्टर सबम्युनिशन्समुळे झाले.
इराणकडून प्रतिहल्ल्याची तयारी सुरु :
इराणच्या लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमक कारवायांनंतरही सर्व शहरांमध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपक सक्रिय ठेवण्यात आले असून दररोज क्षेपणास्त्र डागले जात आहेत. वृत्तानुसार एका लष्करी सूत्राने सांगितले की इराणची क्षेपणास्त्र हल्ला क्षमता पूर्णपणे सक्रिय करण्यात आली आहे. नव्या तुकड्यांची तैनाती करून शत्रूच्या हवाई हल्ल्यांना जलद गतीने निष्प्रभ केले जात आहे.
तेहरानच्या आकाशात अनेक लढाऊ विमाने उड्डाण करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अहवालानुसार तेहरानमध्ये मोठे स्फोट ऐकू आले. इराणवरील अचानक वाढलेल्या हल्ल्यांचा संबंध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीशी जोडला जात आहे. ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत करार करण्याचे अल्टिमेटम दिले होते. तसे न झाल्यास इराणमधील प्रत्येक पूल आणि ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला होता.






