दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’
मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र नव्हते ते होते स्वप्नांचे प्रतिबिंब. प्रत्येक रेषेत जिद्द, प्रत्येक रंगात आशा आणि प्रत्येक कलाकृतीत स्वतःला सिद्ध करण्याची ताकद दडलेली होती. निमित्त होते सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग कलाकारांसाठीच्या विशेष कला कार्यशाळेचे.
मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन येथे ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान दिव्यांग कलाकारांसाठीच्या विशेष कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन यांच्या सहकार्याने व आयसोवा (IASOWA) आणि राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सक्षमीकरण संस्था (NIEPID) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत मुंबई आणि परिसरातील विविध संस्थांमधील ४२ दिव्यांग कलाकारांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेत, आपल्या सर्जनशीलतेची झलक सादर केली आहे. या कार्यशाळेत १८ पेक्षा अधिक संस्थां सहभागी झाल्या. या उपक्रमामागे आयसोवाच्या अध्यक्ष मीनाक्षी अग्रवाल यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार आहे.
कलेच्या माध्यमातून वेगळी ओळख
दिव्यांग कलाकारांसाठी कलाही एक वेगळीच ओळख निर्माण करते. त्यांच्या आयुष्यातील आव्हाने, संघर्ष आणि अनुभव हे त्यांच्या कलेतून अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात. जिथे शब्द अपुरे पडतात, तिथे रंग त्यांच्या भावना स्पष्टपणे मांडतात. कधीकधी एक साधे चित्रही त्यांच्या मनातील खोल विचार आणि भावना व्यक्त करून जाते. शारीरिक किंवा बौद्धिक अडचणी असूनही ही मुल कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत.
या कार्यशाळेचा उद्देश सर्जनशील चित्रकला सत्रे, कौशल्य विकास उपक्रम, आत्मविश्वास वाढविण्याच्या संधी आणि कला क्षेत्रातील करिअर मार्गांची ओळख करून देणे हा आहे.
या कार्यशाळेचा समारोप ८ एप्रिल रोजी होणाऱ्या चित्रप्रदर्शनाने होणार आहे. दुपारी ३ वाजता जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या मुख्य सभागृहात या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, ८ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
दिव्यांग कलाकारांनी आपल्या कलेतून सिद्ध केले आहे की,मर्यादा शरीरात असतात, पण स्वप्नांना आणि सर्जनशीलतेला कधीच मर्यादा नसतात. दिव्यांग कलाकारांसाठी आयोजित हा ‘विविधतेचा उत्सव’ केवळ एक कला उपक्रम नसून, तो आहे त्यांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या कलेचा उत्सव.






