Monday, April 6, 2026

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची असून ही निवडणूक माझी वैयक्तिक नसून दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक बारामतीकरांची आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केल्या. आज पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०१ - बारामती विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळावा कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे पार पडला.

या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय, रयत क्रांती संघटना, भीमशक्ती रिपब्लिकन सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन महिन्यापूर्वी आपण सर्वांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, लोकनेते, आदरणीय अजितदादांना गमावले, ही केवळ माझ्या कुटुंबाची नाही, तर संपूर्ण बारामतीची मोठी हानी आहे. दादांचे जाणे बारामतीकरांना पोरके करून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत ही पहिलीच निवडणूक होत असून त्यांच्या विकासदृष्टीला पुढे नेण्यासाठी आपली साथ अत्यंत आवश्यक आहे अशी हाक बारामतीकरांना घातली.

बारामती शहर हे जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे दादांचे स्वप्न होते. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, मात्र त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिकपणे काम करणे ही, आपली सर्वांची जबाबदारी आहे. संपूर्ण बारामती हे माझे कुटुंब आहे, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी मेळाव्यात व्यक्त केल्या.

दादांचा जनता दरबार जसा सर्वांसाठी खुला होता, तसाच तो पुढेही कायम ठेवत प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत राहणार असे सांगतानाच शहरात बेकायदेशीर व जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या कोणत्याही गोष्टींना थारा दिला जाणार नाही. दादांनी सुरू केलेले सर्व विकासकामे पूर्णत्वास नेण्याचा माझा निर्धार आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महायुतीतील सर्व नेत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दादांच्या आठवणींना साक्षी ठेवून त्यांच्या विचारांना अनुसरून सतत कार्यरत राहण्याचा संकल्प सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

गेली अनेक वर्षे दादांनी ज्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या, त्याच समर्पणाने आता बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना शब्द दिला.

Comments
Add Comment