Saturday, April 4, 2026

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर

गावाचं गावपण राखून असलेलं बोर्डी हे डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य गाव. भारत सरकारच्या योजना आयोगाचे सदस्य राहिलेले बोर्डीचे सुपुत्र कृषी वैज्ञानिक डॉ. जयंतराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी पाटील कुटुंबीयांच्या निमंत्रणावरून कार्यक्रमाचे निवेदन करण्यासाठी मी बोर्डीला गेले होते. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मी डॉ. जयंतराव पाटील यांच्या कन्या लता पाटील यांना विचारले की त्यांच्या वडिलांच्या कार्याचा, जीवनपटाचा परिचय होईल असे एखादे पुस्तक वाचायला द्याल का? त्यांनी मला त्यांच्या वडिलांनी लिहिलेले ‘कृषी वैज्ञानिकाची साधना’ हे पुस्तक वाचायला दिले.

पुस्तकाच्या पहिल्या पानापासूनच ध्येयवाद, निःस्पृह सेवाभावी वृत्ती आणि समाजबांधवांविषयी असलेल्या अपार करुणेतून डॉ. जयंतराव यांनी कृषी क्षेत्रात केलेला प्रवास वाचताना मी भारावून गेले. ‘गरज ही शोधाची जननी असते,’ असे म्हटले जाते, ते खरेही आहे.

पण हे पुस्तक वाचताना जाणवले की वंचित समाजाच्या विवंचना, दुःख पाहून मनात निर्माण झालेली करुणा, त्यांचे कल्याण व्हावे ही मनातील उदात्त भावना डॉ. जयंतराव पाटील यांच्या संशोधानामागे, कार्यामागे आहे.

मनोमन मी डॉ. जयंतराव पाटील यांना त्रिवार वंदन केले. आज डॉ. जयंतराव आपल्यात नाहीत पण त्यांचे कार्य एका दीपस्तंभाप्रमाणे समाजाला दिशा दाखवणारे आहे. डॉ. जयंतराव पाटील यांनी पुस्तकात आपल्या वडिलांची एक आठवण सांगितली आहे. १९४९ साली डॉ. जयंतराव यांनी कार्याला प्रारंभ केला तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले होते की तू या कार्यात ‘साधक’ म्हणून तुझी भूमिका ठेव, फळाची अपेक्षा ठेवू नकोस. वडिलांचा उपदेश शिरसांवद्य मानून कृषी क्षेत्रात साधक म्हणून त्यांनी कार्य केले. आदिवासी व ग्रामीण विकास, कृषी आणि शिक्षण अशा तीन स्तरांवर डॉ. जयंतराव पाटील यांनी कार्य केले.

आचार्य भिसेंनी आदिवासी क्षेत्रात कोसबाड येथे स्थापन केलेल्या कृषी संस्थेची धुरा डॉ. जयंतराव पाटील यांनी वाहिली. शेतीच्या क्षेत्रातील अनेकविध प्रयोग आणि प्रात्यक्षिके पाहण्यासाठी देश – विदेशातून अनेक अभ्यासक, मंत्री कोसबाडला येत असत. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा नाईक देखील कोसबाडला येत असत. तेथील काम पाहून कोसबाड येथील कृषी संस्था ‘महाराष्ट्राची कृषी पंढरी आहे,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले होते, यावरून कोसबाड कृषी संस्थेच्या कार्याची व्याप्ती लक्षात येते. या कृषी पंढरीने कृषी क्षेत्रात ‘लोकशाही’ आणली, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. डॉ. जयंतराव पाटील यांचा अभ्यास, संशोधन केवळ पुस्तकांमध्ये व चर्चासत्रे, परिषदांमध्ये बंदिस्त राहिले नाही, तर त्यांनी आपल्या अभ्यासाला प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन आदिवासीबहुल असलेल्या परिसराला स्वावलंबी बनविण्यासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित केले. कोसबाड कृषी विज्ञान केंद्र, आश्रमशाळा अशा विविध कल्याणकारी संस्थांच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. ज्यातून प्रेरणा घेऊन समकालीन आणि पुढील पिढ्या घडल्या.

डॉ. जयंतराव पाटील यांच्या प्रेरणेतून डहाणू तालुक्यातील कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या डॉ. सुमित ढाक या आदिवासी तरुणाचे नाव थायलंड पांढऱ्या जांभळांच्या लागवडीमुळे प्रकाशझोतात आले आहे. डॉ. सुमित हे मूळचे कोसबाड येथील. डॉ. जयंतराव पाटील यांच्या पत्नी मीनाताई यांच्या शाळेत सुमित यांचे शिक्षण झाले. बारावीनंतर काय करता येईल याविषयी त्यांनी डॉ. जयंतराव यांचा सल्ला घेतला. त्यांनी मातीशी नाळ जुळलेल्या या विद्यार्थ्याची नेमकी नस ओळखली आणि त्याला पुढील शिक्षण कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे डॉ. सुमित यांनी कृषी अभियांत्रिकीमध्ये बी. टेक आणि एम. टेक पूर्ण केल्यानंतर मृद्संधारण विषयात पीएच.डी. मिळवली आहे. त्यांच्या प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद झाला आहे. हातात एवढ्या पदव्या असताना गलेलठ्ठ पगाराची नोकरी करण्याऐवजी आपल्या ज्ञानाचा उपयोग पालघरमधील शेती सुधारण्यासाठी व्हावा, यासाठी त्यांनी आपले हात मातीत मिसळले. पालघर जिल्ह्यातील बाहाडोली काळ्या जांभळांना मानांकन प्राप्त आहे. पण परदेशी वाण मोखाड्याच्या मातीत टाकून सुमित यांनी केलेला धाडसी प्रयोग यशस्वी ठरला आहे.

मोखाड्यासारखा परिसर जिथे पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी ठिबक सिंचन आणि शेणखताचा वापर करून त्यांनी पांढऱ्या जांभळांची शेती केली आहे. २०२३ मध्ये डॉ. सुमित यांनी थायलंड पांढऱ्या जांभळांची लागवड केली, ज्याला ३ वर्षांनंतर मोहर येऊन पांढरी जांभळे गुच्छाने लगडली आहेत. प्रती झाड ५ ते ६ किलो उत्पादन अपेक्षित असून १५० ते १६० रुपये प्रतिकिलो फळांना बाजारभाव आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे येणाऱ्या काळात पालघरसह नाशिक, कोकणासाठी किडनी विकार, पोटाचे विकार, रक्ताची कमतरता, मधुमेह यासाठी गुणकारी असलेली चविष्ट पांढरी जांभळे शेतकऱ्यांना किफायतशीर ठरतील असे डॉ. सुमित यांचे म्हणणे आहे. Tribal Educational and development Society ही डॉ. सुमित यांची एन्जिओ संस्था असून या माध्यमातून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शेतकऱ्यांना विनामूल्य रोप वाटप असे विविध उपक्रम राबवत असतात. मोखाड्यासारखा अतिदुर्गम भागातील परिसर, तिथली जमीन ही त्यांची शेतीची प्रयोगशाळा आहे, जिथे ते विविध लागवडीचे प्रयोग करत असतात. शेती क्षेत्रातील कार्याबद्दल शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते २०२५ चा ‘सायबर इन ट्रायबल एक्सेलंस अॅवाॅर्ड’ पुरस्कार प्राप्त झाल्यावर डॉ. सुमित यांनी आपल्या मनोगतात आवर्जून डॉ. जयंतराव पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. बोर्डी कोसबाडच्या मातीलाच खरं तर सेवाभावाचा गंध आहे. आचार्य भिसे गुरुजी, पूज्य चित्रेगुरुजी, स्वामी आनंद, ताराबाई मोडक ह्या ऋषीतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्याला लाभले, असा उल्लेख डॉ. जयंतराव पाटील यांनी पुस्तकात केला आहे. स्वामी आनंद यांची एक प्रेरणादायी आठवण पुस्तकात वाचायला मिळते, ती अशी - अमेरिकेतील एका मोठ्या उद्योगपतीने डॉ. वाशिंग्टन कार्व्हर ह्यांनी आपल्या उद्योगसमूहात येऊन सल्ला द्यावा, यासाठी लक्षावधी डॉलर्स देऊ केले होते; परंतु ते त्यांनी नम्रपणे नाकारले. आपली टस्कगी येथील कार्यशाळा त्यांनी सोडली नाही. कारण ज्या निग्रो समाजात आपला जन्म झाला त्यांच्या सेवेला वाहून घेणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले होते. हे उदाहरण देऊन स्वामी आनंद म्हणत की, जीवनात करिअर किंवा कमिटमेंट ह्या दोघांपैकी एक गोष्ट निवडावी लागते. कार्व्हर यांनी वैयक्तिक हित न पाहता समाजाचे हित पाहिले, कमिटमेंटला प्राधान्य दिले. स्वामी आनंद यांच्या विचारांचे मूर्त रूप डॉ. जयंतराव पाटील यांच्या कार्यात दिसते. ते अभ्यासासाठी जगभर फिरले, भारत सरकारच्या योजना आयोगातही त्यांनी काम केले; परंतु बोर्डी हीच त्यांची कर्मभूमी राहिली.

डॉ. जयंतराव पाटील यांनी बोर्डी – कोसबाडच्या जमिनीत केवळ बी-बियाणेच पेरले नाही तर आपल्या कार्यातून विधायक विचारही पेरले, ज्याचे मूर्त रूप डॉ. सुमित ढाक यांच्यासारख्या तरुण शेती संशोधकांच्या कामातून आपल्याला दिसत आहे. हीच खरी समर्पित भावनेतून समाजकार्याला वाहून घेतलेल्या डॉ. जयंतराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना वाहिलेली आदरांजली आहे, नाही का? A

Comments
Add Comment