मनस्विनी - पूर्णिमा शिंदे
बालकांच्या मनाचा विचार करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर उपाययोजना करणे, बालकांकडून त्या-त्या वयामध्ये अपेक्षित वर्तन परिवर्तन क्षमता, क्रिया, प्रतिक्रिया जाणून घेणे. याविषयी प्रयत्न करणे. त्यांना समजून घेणे. त्यांच्या मनाचा कल्प पाहणे. अभिरुची पाहणे. ते ओळखून प्रसंगी त्यांच्या मनातलं जाणून घेणे ते त्यांच्या तोंडून वदवून घेणे. एकदा समस्या कळली की हे अभ्यासता येते. समस्येचं निराकरण करण्यासाठी बालकाला बोलतं करणं गरजेचं अाहे. त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना, त्या घटनांचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झालेला असतो. त्यांच्या या शंकांचं निरसन होणं गरजेचं आहे. पण ते जेव्हा आपल्याला सांगू लागतील तेव्हाच हे शक्य आहे. कधी ती शांत असतात, तर कधी खूप बोलतात! नेमकेच बोलत नाही. तेव्हा प्रश्नाच्या पद्धतीने त्याची उकल करून घेणे योग्य ठरते.
त्यांचे अवतीभोवती असलेल्या परिस्थितीशी वागणे कसे आहे. सोबतच्या व्यक्तींकडे त्यांची काय मागणी आहे? विचारांची देवाणघेवाण बोलण्याची आंतरक्रिया किंवा त्याची प्रतिक्रिया काय असते! यावर त्यांचा स्वभाव समजून येतो. ती अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? वर्तन-परिवर्तन काय सांगत आहे! ते बालक खूप विचारी असेल आणि समस्या प्रधान असेल, तर त्यावर वेगळा फोकस करावा लागतो. समाजाशी त्याचे वागणे कसे आहे, पटवून घेतो का? आलेल्या परिस्थितीवर मात कसा करतो, की घाबरतो. कम्युनिकेशन कसं आहे! याबद्दल त्याला ग्रूमिंग करावं लागतं. त्याच्याशी संवाद साधावा. काय बोलावे ! कसे बोलावे? कधी बोलावे? मग त्या प्रश्नांचा क्रम कसा असावा! हे संभाषण करण्यासाठी संवाद साधण्यासाठी त्या मुलाचे आपल्याशी बोलणे होते का, कसे होते? त्याचे सूक्त कलागुण कोणते आहेत त्यानंतर एक माणूस म्हणून तो समोरच्याला समजून किती घेतो, आदर किती करतो? त्याचा स्वतःविषयीचा स्वभाव कसा आहे. तो कसा व्यक्त होतो, त्याच्यामध्ये प्रवृत्ती कशी आहे. या सगळ्या गोष्टी माहिती करून घेणे गरजेचे आहे आणि ते एक तंत्र आहे. त्याची आयक्यू टेस्ट क्षमता अभिरुची कॉल कौशल्य स्वभाव जाणून घेणे. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे त्याच्या मनातील न्यूनगंड काढून टाकले पाहिजे, नेमकी नस ओळखायला हवी. भीती, नैराश्य जाऊन विचार करावा लागेल! त्याचा आत्मविश्वास कसा आहे त्याचबरोबर त्याचे मन प्रसन्न आहे का? तितकाच मानसिकरीत्या तो सुदृढ परिपक्व किंवा निरोगी आहे का? आणि जर नसेल, तर त्यावर उपाययोजना करावी लागेल; परंतु संवेदनशील असेल तर त्याच्या हळुवार मनाला जपावेही लागेल. शिक्षण, संगोपन, संस्कार आपण देतच असतो. पण त्याबरोबर त्याला प्रबोधनात्मक संदेश देणे गरजेचे. त्याच्यात सुधारणा करणे गरजेचे. त्याचं लक्ष केंद्रित होण्यासाठी एकाग्र होण्यासाठी त्याला प्रवृत्त केले पाहिजे. ध्यान, योगा, मेडिटेशन, व्यायाम सूर्यनमस्कार संगीत भटकंती सहल त्याच्या आवडीचे आहार विहार या सगळ्या गोष्टी समुपदेशक आणि लक्षात ठेवायला हव्यात. त्याच्या मनावर होणारे परिणाम वेळीच ओळखायला हवे किंवा पूर्वी कधी घडून गेलेला भूतकाळ, त्याच्या जीवनाशी निगडित असलेला प्रवास लक्षात घ्यायला हवा. त्याच्याकडे पाहताना योग्य दृष्टिकोनाने पाहावे. पारदर्शकता, लवचिक, सौजन्यशीलता आणि आत्मीयतेने, जिव्हाळ्याने बोलावे. प्रेमळ हाक मारावी. त्याचे नाव लक्षात ठेवावे. त्याच्यात सुधारणा घडविण्यासाठी केसस्टडी तपासावेत, रिपोर्टपासून आपल्यासमोर असावेत. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे. त्याचबरोबर त्याच्या आयुष्यात सगळ्या घडामोडीचा लेखाजोखा आपल्याकडे असावा. त्याची तीव्र मानसिक समस्या जाणून घ्याव्यात. त्यानुसार प्रयत्न करावेत. प्रसंगी त्याला उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करावा. मानसशास्त्रामध्ये मनाचे, आत्म्याचे, बोधाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. त्या त्या वयावरती ते अवलंबून असते.
मानसशास्त्राचे स्वरूप बदलत जाते. पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी, किशोरवयीन मुलांमध्ये घरची परिस्थिती पाहून वेगवेगळे दुष्परिणाम उद्भवतात पालकांचा प्रभाव कौटुंबिक जीवन, मूलभूत गरजा, प्रतिकूल परिस्थिती हा संघर्ष असेल, तर उदासीनता असते. मुलांमध्ये खिन्नता आणि नैराश्य असते. ती मुलं निरागस पण विरस असतात. खचून जाणारी, कोणाचंही न ऐकणारी, जिद्दी, हेकडी किंवा रगीलपणा असतो. आपण अशा मुलांना आधार देऊन त्यांना भावनिक मानसीक, शारीरिक, कौटुंबिक तसेच शालेय जीवनाचे मूल्यनिष्ठा, नैतिकता हे संस्कार देणे. जगण्यासाठी आवश्यक सुविधा, आहार पोषण योजना, प्रशिक्षण, जीवन विषयक कौशल्य, शैक्षणिक प्रगती यावर भर देऊ शकतो. त्यांना त्यांच्या ध्येय उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो, पण व्यसन असेल, तर उदा. चोरी, सिगारेट, मोबाइल, गुटखा, ड्रग्स, दारू, तंबाखू अपप्रवृत्ती, मानसिक विकृती कधीकाळी कोणाकडून किंवा निरीक्षणातून जर त्यांना अशी व्यसन आली. त्यातून ते व्यसनाध होत असेल, तर त्यांना व्यसनापासून परावृत्त केले पाहिजे. उदा. खोटे बोलण्याची सवय असते. उद्धट वागण्याची सवय, चोरी करण्याची सवय,अस्वच्छ राहण्याची सवय अशावेळी त्यांना चांगल्या सवयी लावाव्यात. वेळच्यावेळी चांगली कार्य स्वच्छतेची ओळख पटवावी त्याचे महत्त्व पटवावे. व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रवृत्त करावे. आई-वडिलांकडून अनुवंशिकतेने काही आजार वाईट सवयी आलेल्या असतात त्यांनाही वेळीच आळा घालावा. शारीरिक, मानसिक व्याधी आजार, असाध्य रोग असतील, तर वेळेवर वैद्यकीय उपचार करावे. त्या अडचणी जाणून त्यावर उपाययोजना आणि वैद्यकीय मदत संस्थेमार्फत करावी लागते.
बोधकथेमधून त्यांना शौर्य, धैर्य, औदार्याच्या कथा सांगाव्यात. जिद्दीच्या ध्येयाप्रत जाण्याच्या, सेवाभावी, सुजाण नागरिकत्वाच्या कथा सांगाव्यात. नैतिक मूल्यांच्या जेणेकरून चांगलं नागरिक बनविण्यासाठी चांगला माणूस घडवण्यासाठी त्यांना चांगले सुविचार सांगावेत. त्यांचे मनोरंजन करावे. अभ्यासाकडे, खेळाकडे, कलेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सृजनभान वाढवणारा असावा. सर्जनशील तिकडे नेणार असावा. शारीरिक, बैठे खेळ असतील. मैदानी खेळ असतील ते त्यांना शिकवावे. त्यातील कुतूहल, त्यांना जाणून घ्यायचे असते त्याचं मार्गदर्शन करावे. त्यावर समुपदेशन करावे कौशल्य विकासावर भर द्यावा. स्वावलंबनाची पायाभूत रचना रुजवावी. आनंददायी शिक्षणातून मार्गदर्शन करावे. कधी-कधी काव्य, विनोद, गाणी, प्रार्थना, खेळ, नृत्य, नाट्य साहित्य, वाचन, भाषण, लेखन, मनोरंजन अभ्यास इत्यादीसाठी तसेच सकारात्मकता विधायक दृष्टिकोन, संघटन, ऐक्य, मैत्री, संहाद्रता, सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि सृजनता इ. नैतिक मूल्यं यातून त्यांच्यामध्ये संस्कार रुजवावे. सुप्त कलागुणांना ओळखावं. व्यासपीठ मिळून द्यावे.आधार द्यावा. सुखदुःखाच्या प्रसंगी त्यांचं कौतुक, प्रोत्साहन, प्रेरणा, पाठबळ, शाबासकीची थाप हे सगळं करावे. हे करत असताना ते आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. असे समजून त्यांना समजून घेणे. अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वांना आकार मिळतो. त्यांना आधार मिळतो. हेच वय असतं घडणं बिघडणं. एखाद्या रोपाला खतपाणी घालावं. मायन मशागत करावी. सुविचाराचा कोंदण द्यावं आणि जपावं. तशीच ही मुलं हळूहळू छान मोठी होऊ लागतात. किशोरवयीन उंबरठ्यावर त्यांना समजून घेणारा, मायेची फुंकर घालणार आणि वेळोवेळी मार्गदर्शन द्यावे. समुपदेशन करून मनातल्या चार गोष्टी ओळखून मायेचं असं कोणी असेल, तर त्यांनाही जगण्याला आधार मिळतो.






