गोष्ट लहान, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर
समाजात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या विचारांची, स्वभावाची आणि अनुभवांची असते. अशा परिस्थितीत इतरांना योग्य मार्गावर आणणे ही एक जबाबदारीची आणि संयमाची गोष्ट आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्या मनात सुसंगत धारणा (Positive & Consistent Attitude) असणे अत्यंत आवश्यक आहे.
१. स्वतःचा आदर्श निर्माण करा : इतरांना योग्य मार्ग दाखवायचा असेल, तर आपण स्वतः त्या मार्गावर चालणारे असणे गरजेचे आहे. आपल्या वर्तनातून, बोलण्यातून आणि कृतीतून सकारात्मकता दिसली, तर लोक आपोआप प्रभावित होतात.
२. प्रेम व समजूतदारपणा ठेवा : इतरांना मार्गदर्शन करताना कठोरता किंवा राग न दाखवता प्रेमाने, शांतपणे आणि समजूतदारपणे संवाद साधावा. प्रत्येकाच्या परिस्थितीची जाणीव ठेवूनच त्यांना मार्गदर्शन करावे.
३. संयम आणि सातत्य आवश्यक : कोणालाही एका दिवसात बदलता येत नाही. बदलासाठी वेळ लागतो. त्यामुळे संयम बाळगून सातत्याने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
४. सकारात्मक संवाद ठेवा : नकारात्मक टीका करण्याऐवजी सकारात्मक मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. योग्य शब्दांची निवड आणि प्रेरणादायी बोलणे यामुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
५. सुसंगत धारणा विकसित करा : सुसंगत धारणा म्हणजे विचार, बोलणे आणि कृती यामध्ये एकसारखेपणा ठेवणे. आपल्या तत्त्वांमध्ये स्थिरता असेल, तर इतरांना मार्गदर्शन करताना विश्वास निर्माण होतो.
इतरांना योग्य मार्गाला लावणे ही केवळ शिकवणूक नसून एक जबाबदारी आहे. सुसंगत धारणा, संयम, प्रेम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या साहाय्याने आपण केवळ इतरांचेच नव्हे, तर स्वतःचेही व्यक्तिमत्त्व उंचावू शकतो. समाज घडवण्यासाठी प्रत्येकाने ही भूमिका मनापासून पार पाडली पाहिजे.
पावनभिक्षा दे रे राम । दीनदयाळा दे रे राम । अभेदभक्ती दे रे राम। आत्मनिवेदन दे रे राम॥
चौपदी समर्थांच्या काळात ज्यांना समाजसेवा करायची आहे अशी माणसे नोकरी अथवा व्यवसाय करीत नसत. ती माणसे पूर्णवेळ लोकहिताच्या कामात व्यस्त असत. त्यांच्या गरजा अत्यंत कमी असत. अंगावर जाडाभरडा कपडा असला आणि जेवायला चार घास अन्न मिळाले म्हणजे ते तृप्त असत. व्याप वाढू नये म्हणून असे समाजसेवक विवाहबंधनात अडकत नसत. लोकशिक्षणासाठी ते गावोगाव हिंडत असत.
एखाद्या झाडाखाली झोपत असत. दुपारी पाच घरे भिक्षा मागून त्या दिवशीचे जेवण मिळवीत असत. एका कुटुंबावर आपल्या जेवणाचा ताण नको म्हणून ते पाच घरे भिक्षा मागत. भिक्षेत अन्न पवित्र समजले जाई, म्हणून समर्थ त्याला पावनभिक्षा म्हणत. अशा भिक्षेतून समर्थांनी अनेकांना भक्तिमार्गाला लावले.
कऱ्हाडजवळ शहापूर नावाचे गाव आहे. तेथे सतीबाई कुलकर्णी नामक श्रीमंत बाई राहत असत. सारे काही अनुकूल असल्यामुळे त्या बाईला संपत्तीचा गर्व होता. समर्थ त्या बाईकडे भिक्षा मागायला गेले तेव्हा तिने भिक्षा तर वाढली नाहीच, पण समर्थांना तिने चक्क पोतेरे फेकून मारले. समर्थांनी भिक्षेसाठी जावे आणि त्या बाईने पोतेरे फेकून मारावे हा क्रम अकरा दिवस चालू होता. बाराव्या दिवशी समर्थ वाड्यावर श्लोक म्हणत उभे राहिले. पण ती बाई घरातून बाहेर पडली नाही. चौकशीअंती समर्थांना कळले, की त्या बाईच्या नवऱ्याला आदिलशहाच्या माणसाने पकडून नेले आहे. समर्थांनी त्या बाईला भेटून सांगितले की, तुम्ही राम नाम जप करा. तुमचा नवरा नक्की सुटून येईल. त्यानुसार जप सुरू करताच अवघ्या आठ दिवसांत त्या बाईचा नवरा सुटून आला. नेमके दुसऱ्या दिवशी समर्थ भिक्षेला आले. त्या बाईने समर्थांना घरातच जेवायला बोलावले. ती समर्थांची आणि रामाची पुढे अनन्य भक्त झाली. भिक्षेच्या निमित्ताने समर्थांनी असे अनेक लोक भक्तिमार्गाला लावले.






