Saturday, April 4, 2026

पृथ्वीची निर्मिती

पृथ्वीची निर्मिती

विज्ञानकथा - प्रा. देवबा पाटील

पंधरा-वीस मिनिटांतच त्यांची बस वेदपूरला पोहोचली. बस थांबता बरोबर सारी मंडळी पटापट बसमधून खाली उतरली आणि जणू काही उड्या मारीतच रस्त्याने चालू लागली. शिवसेनेने प्रथम वेदपुरातील इतर मंदिरं बघून घेतली. नंतर त्यांनी आपला मोर्चा टेकडीवरील शिवमंदिराकडे वळविला.

रमतगमत, निसर्गसौंदर्य न्याहाळत, गप्पागोष्टी करत, कवितांच्या भेंड्या खेळत, गाणी म्हणत, हसत-कुदत ते शिवमंदिराजवळ पोहोचले. त्यामुळे टेकडीची अवघड चढण काही त्यांना जाणवली नाही. सारे महादेवाच्या मंदिरात गेले. मंदिर खूपच सुंदर व विस्तीर्ण होते. त्यांनी भक्तिभावे भोलेनाथ शंकरजींचे दर्शन घेतले. प्रत्येकाने घरून आयांनी दिलेले नारळ तेथे फोडले. तेथील भक्तांना व एकमेकांना प्रसाद वाटला. बालमंडळी छोट्या-छोट्या टेकड्यांवर खूप भटकली. एव्हाना दुपार झालीच होती. वेदपुरात वेगवेगळी मंदिरे बघताना फिरून फिरून व शिवमंदिराची टेकडी चढून तशीही मुलं थकली होती. साऱ्यांना सपाटून भुका लागल्या होत्या. ते मंदिराच्या प्रशस्त आवारात एका झाडाखाली सावलीत बसले.

“मित्रांनो, आता तर आपणास खूप भुका लागल्या आहेत. त्यामुळे आता आपण डबे खायला काही हरकत नाही,” अमोल म्हणाला. “गड्या माझ्या मते आपण आता नुकतेच टेकडीची चढण चढून वर आलो आहोत. आपण खूप फिरलोही आहोत. त्यामुळे एकदम जेवण न करता आपण थोडा आराम करू व मग थोड्या वेळाने डबे खाऊ,” कौशल म्हणाला.

“बरोबर.” शिवम् त्याला दुजोरा देत बोलला, “आपण थकलोही आहोत आणि जास्त चालल्यानंतर वा थकल्यांनतर ताबडतोब जेवण घेणे पोटाच्या दृष्टीने योग्य नसते. एखाद्याचे पोटही दुखू शकते. त्यामुळे आता आपण थोडी विश्रांती घेऊ व नंतर शांततेने जेवण करू.” सा­ऱ्यांना ते पटले व ते तथेच झाडाखाली तेथून दिसणा­ऱ्या टेकडीवरील निसर्गसौंदर्य बघत, गप्पागोष्टी करीत, थोडा आराम करीत बसले. आराम करता करता त्यांच्यातील कौशल नावाच्या मुलाने बाजूच्या डोंगराकडे बघत सहज गोष्ट काढली, “गड्यांनो! हे एवढे उंचच उंच डोंगर बघा कसे सुंदर दिसताहेत. हे भव्य उंच पर्वत व ह्या अतिशय खोल खोल दऱ्­या कशा काय निर्माण झाल्या असतील बरं?” शिवम् म्हणाला, “सांगू का तुम्हाला हे खडक-दगड, डोंगर-दऱ्­या कसे काय निर्माण झालेत ते?” “तुला माहीत आहे का रे याबद्दलच्या साऱ्­या वैज्ञानिक गोष्टी?” कौशलने विचारले. “हो.” शिवम् म्हणाला. “आपल्या पृथ्वीच्या निर्मितीपासूनच सुरुवात करू गड्या,” विपूलने कौशलच्या म्हणण्याला दुजोरा दिला. “ऐका तर मग.” शिवम् सांगू लागला, “सूर्याचा भयंकर मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटाने त्याचे काही तुकडे झालेत. स्फोट इतका जोराने झाला की, ते तुकडे आकाशात दूरवर फेकले गेले. मूळचा खूप मोठा तुकडा हा तसाच उष्णच राहिला व तोच सूर्य बनला. बाकीचे इतर उष्ण तुकडे मात्र त्यांच्या स्वत:भोवतीच्या वातावरणाने कालांतराने हळूहळू थंड होत गेले, घन झालेत व त्यांचे ग्रह बनलेत. या तुकड्यांपैकी म्हणजे आता या ग्रहांपैकीच एक ग्रह म्हणजे आपली मायमाऊली पृथ्वी होय.

अतिशय वेगाने ते सारे खूप दूर फेकल्या गेल्याने त्यांनाही वेग प्राप्त झाला व ते स्वत:भोवती फिरू लागले. अशा रीतीने ते स्वत:भोवती तर फिरू लागलेतच पण मूळ सूर्याभोवतीही फिरू लागले. तर अशी ही आपली पृथ्वी सुमारे ४६ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाली असावी, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.”

Comments
Add Comment