मुंबई : आयपीएल २०२६ च्या सातव्या सामन्यात, पंजाब किंग्सने (पीबीकेएस) चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) ५ गडी राखून पराभव केला. कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. प्रियांश आर्यानेही ३९ धावांची धडाकेबाज खेळी केली. या हंगामात पंजाबचा हा सलग दुसरा विजय होता. पण पंजाब किंग्सला या विजयाचा पुरेपूर आनंद साजरा करता आला नाही. षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अय्यरसोबतच संपूर्ण संघालाही दंड ठोठावण्यात आला आहे.
पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सने ठेवलेले २१० धावांचे लक्ष्य १८.४ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले. पंजाबने दमदार सुरुवात केली. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी शानदार फलंदाजी करत ४.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. प्रियांशने केवळ ११ चेंडूंचा सामना करत ३५४ च्या स्ट्राईक रेटने ३९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार मारले. प्रभसिमरनने ३४ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. कूपर कॉनोलीने ६ चौकारांच्या मदतीने २२ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. पण नेहल वाढेरा १० धावांवर मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने त्याने आपल्या कामगिरीने निराशा केली.






