- पाणी गळती शोधून काढण्यासाठी पथके तैनात करण्याचेही बांगरांनी दिले आदेश
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून प्रकल्प कामांचा आढावा घेत त्यांना गती देण्यासाठी त्या कामांच्या मागे धावणाऱ्या महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांना अखेर पाणी गळती आणि दुषित पाणी दिसून लागले आहे. बांगर यांनी दुषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण करताना पाणी गळती शोधून काढण्यासाठी पथके तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या समस्येकडे पाठ फिरवणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांना या प्रश्नांची उकल झाल्यामुळे एकप्रकारे महापालिका आयुक्तपदी विराजमान झालेल्या अश्विनी भिडे यांचा पायगुणच असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई सध्या प्रगतीपथावर असलेली रस्त्यांची कामे, उन्हाळ्यात वाढणारी पाण्याची गरज आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याची एक विशेष आढावा बैठक महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्तम माळवदे, जल अभियंता दिलीप पाटील यांच्यासह जल अभियंता खात्यातील संबंधित वरिष्ठ अभियंते व अधिकारी उपस्थित होते
या बैठकीमध्ये बांगर यांनी , गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी काही ठिकाणांहून येत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विनाविलंब स्थळ पाहणी करावी. या पाहणी दरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्यास विनाविलंब योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. या उपाययोजनांमध्ये आवश्यक तेथे पाणीपुरवठ्याच्या सध्याच्या वितरण यंत्रणेमध्ये काही बदल केल्यामुळे काही मार्ग निघू शकतो. उदाहरणार्थ पाणीपुरवठ्याच्या 'झोनिंग' पद्धतीमध्ये योग्य त्या सुधारणा करणे, एखाद्या जलवाहिनीवर गळती उद्भवली असल्यास ही विनाविलंब दुरुस्त करणे, तर काही ठिकाणी व्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल करणे; आवश्यकतेनुसार अतिरिक्त 'बूस्टिंग' विनाविलंब करणे; यासारख्या बाबींचा उपाययोजनांमध्ये समावेश करता येईल,असेही बांगर यांनी सांगितले. त्यानुसार अपु-या पाणीपुरवठ्याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहींबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अवगत करावे. शक्यतो लोकप्रतिनिधींच्या सोबत पाहणी दौरे करावेत, जेणेकरून त्यांच्याकडून जी माहिती मिळणे अपेक्षित आहे, ती माहिती थेटपणे मिळू शकेल, अशाही सूचना बांगर यांनी आढावा बैठकीदरम्यान दिल्या.
अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर या बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,आढवा बैठकीदरम्यान दूषित पाण्याच्या तक्रारींबाबत देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. दूषित पाण्याबाबतच्या तक्रारींबाबत कार्यवाही करताना कमालीची तत्परता दिसणे आवश्यक आहे. दूषित पाण्याच्या तक्रारींबाबत विना विलंब कार्यवाही झाली नाही, तर त्याचा परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतो, या बाबींची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे. तसेच याबाबत सर्व यंत्रणांनी अत्यंत संवेदनशील राहणे गरजेचे आहे, अशाही सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
पाणीपुरवठा विषयक प्रकल्प हे विहित वेळेत पूर्ण होण्यास अडचणी येत असतील, तर अभियंत्यांना आवश्यकतेनुसार सहकार्य व मदत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जावी. तसेच या अनुषंगाने कुणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, तर याबाबत जबाबदारी निश्चित करण्यासह संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी; असेही बांगर यांनी आजच्या बैठकीदरम्यान नमूद केले.
मुंबई महानगरपालिकेसह इतर प्राधिकरणांमार्फत रस्ते विकासासह इतर कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या काही ठिकाणी स्थानांतरीत कराव्या लागतात, तर काही ठिकाणी जलवाहिन्यांना हानी पोहोचू शकते. यामुळे संबंधित परिसराचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित होऊ शकतो. अशी परिस्थिती उद्भवल्यास सदर परिसरातील जलवाहिन्यांची तातडीने दुरूस्ती करावी, किंवा आवश्यकतेनुसार नवीन जलवाहिन्या टाकाव्यात. ही सर्व कामे करत असताना जल अभियंता खात्यातील विविध उपविभागांसोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यांशी आणि मुंबईतील विविध प्राधिकरणांशी सुयोग्य समन्वय साधून लवकरात लवकर सदर कामे पूर्ण करावीत. जेणेकरून रस्त्यांची कामेदेखील निर्धारित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असेही बांगर यांनी आजच्या बैठकीदरम्यान आवर्जून आदेशित केले.






