- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर
दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री ९:४२ वाजता भूकंपाचे जोरदार (Delhi Earthquake) झटके जाणवले. दिल्ली-एनसीआर, चंदीगड, हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक भागात हे झटके जाणवले. यासोबतच जम्मू-कश्मीरच्या अनेक भागांमध्येही जमीन हलल्यामुळे लोक घराबाहेर पडले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रवास ५.९ इतकी मोजण्यात आली असून भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान-तजाकिस्तान सीमेवर असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिल्ली-एनसीआर मधील अनेक उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांना या भूकंपाचे झटके स्पष्ट जाणवले. ऑफिस आणि घरी बसलेले लोक लगेच बाहेर पडले. काही ठिकाणी लोक पार्क आणि मोकळ्या मैदानात एकत्र झाले. जम्मू-काश्मीरच्या उधमपूर, पुंछ आणि काश्मीर खोऱ्यातील अनेक भागातही भूकंपाचे झटके जाणवले. हे झटके काही सेकंदांसाठी जाणवले. पाकिस्तानमधील इस्लामाबाद, पंजाब आणि पेशावरसह अनेक भागातही जोरदार झटके जाणवले. या भूकंपामुळे सध्या कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही, परंतु प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. प्रशासनाने लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले. तसेच अफवांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. भूकंपाच्या झटक्यांनंतर लोक सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर करताना दिसले. अनेक लोकांनी सांगितले की त्यांना अचानक पंखे आणि फर्निचर हलताना जाणवले. सध्या प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम्स परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत आणि गरज भासल्यास तत्काळ कारवाईस तयार आहेत.






