मुंबई : शहरात पार पडलेल्या एका भव्य कला लिलावाने कला विश्वासह उद्योग क्षेत्रातही मोठी चर्चा रंगवली आहे. एका ऐतिहासिक पेंटिंगने कोट्यवधींची बोली लावत विक्रमी किंमत गाठली असून, हा व्यवहार आधुनिक भारतीय कलेतील सर्वात महागड्या लिलावांपैकी एक ठरला आहे.
राजा रवी वर्मा यांची प्रसिद्ध कलाकृती ‘यशोदा आणि कृष्ण’ ही Saffronart च्या स्प्रिंग लाईव्ह लिलावात तब्बल १६७.२० कोटी रुपयांना विकली गेली. विशेष म्हणजे, मॉडर्न इंडियन आर्टमधील आतापर्यंतची ही सर्वात महागडी विक्री ठरली आहे.
या लिलावात ही प्रतिष्ठित कलाकृती खरेदी करून डॉ. पूनावाला यांनी केवळ नवा विक्रमच केला नाही, तर भारतीय कलेबद्दलचा आपला जिव्हाळाही अधोरेखित केला.मुळात ८० ते १२० कोटी रुपये असा अंदाज असलेल्या या पेंटिंगने सर्व अपेक्षा ओलांडल्या.
१८९०च्या दशकात साकारलेले हे तैलचित्र भगवान श्रीकृष्ण आणि माता यशोदा यांच्यातील वात्सल्याचे अप्रतिम चित्रण करते. यामध्ये यशोदा गाईचे दूध काढत असताना लहान कृष्ण त्यांच्या मागून दुधासाठी हात पुढे करताना दाखवले आहेत, जे भारतीय संस्कृतीतील मातृत्व आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
या खरेदीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. पूनावाला यांनी या कलाकृतीचे जतन करून ती जनतेसाठी उपलब्ध करून देणार असलयाचे सांगितले.






