विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या आयएनएस अरिदमन पाणबुडीचे आणि आयएनएस तारागिरी स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदीत एक एक्स पोस्ट (X Post or Tweet) केली आहे. 'शब्द नहीं शक्ति है अरिदमन' अशा स्वरुपाची सूचक पोस्ट संरक्षणमंत्र्यांनी केली आहे. अरिदमन हा केवळ एक शब्द नाही, ती शक्ती आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
शब्द नहीं शक्ति है, ‘अरिदमन’!
— Rajnath Singh (@rajnathsingh) April 3, 2026
एल अँड टीने विशाखापट्टणम येथील गुप्त जहाजबांधणी केंद्रात अणुऊर्जेवर चालणाऱ्या आयएनएस अरिदमन पाणबुडीची निर्मिती केली आहे. मागील अनेक महिन्यांपासून समुद्रात या पाणबुडीच्या चाचण्या सुरू होत्या. नौदलात सहभागी झाल्यावर ही पाणबुडी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत कार्यरत राहणार आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत २०१६ पासून आयएनएस अरिहंत आणि २०२४ पासून आयएनएस अरिघात कार्यरत आहे. आता स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत आजपासून आयएनएस अरिदमन ही तिसरी पाणबुडीही कार्यरत होणार आहे. विशेष म्हणजे या तिन्ही पाणबुड्या अणुऊर्जेवर चालत असल्यामुळे दीर्घकाळ खोल समुद्रात लपून शत्रूच्या हालचालींचा वेध घेणे आणि योग्य वेळी घातक प्रहार करणे यासाठी सक्षम आहेत.
अणुऊर्जेवर चालणारी आयएनएस अरिदमन ही सात हजार टन वजनाची पाणबुडी आहे. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात या सहा हजार टन वजनाच्या पाणबुड्या होत्या. या दोन्ही पाणबुड्यांपेक्षा आयएनएस अरिदमन महाकाय आणि शक्तिशाली आहे. पूर्वीच्या पाणबुड्यांवरील चारच्या तुलनेत, या पाणबुडीमध्ये आठ व्हर्टिकल लॉन्च सिस्टीम (VLS) ट्यूब आहेत, ज्यामुळे ती चोवीस के-१५ सागरिका ही कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे (७५० किमी) आणि आठ के-४ मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे (३५०० किमी) तैनात करू शकते. तसेच, ती सहा हजार किमी पल्ल्याची के-५ क्षेपणास्त्रे देखील पाणबुडीत सामावून घेऊ शकते.
तब्बल ८३ मेगावॅट क्षमतेच्या कॉम्पॅक्ट लाईट वॉटर रिअॅक्टरवर चालणारी ही पाणबुडी तिच्या रचनेमुळे रडारला चकवू शकते. कमीत कमी आवाज करत ही पाणबुडी दीर्घकाळ प्रभावीरित्या कार्यरत राहू शकते. या पाणबुडीत सात पात्यांचा प्रोपेलर आहे, ज्यामुळे पृष्ठभागावर १२-१५ नॉट्स (सागरी मैल) आणि पाण्याखाली २४ नॉट्सचा (सागरी मैल) वेग मिळतो. प्रगत स्वदेशी सोनार प्रणाली उशूस (USHUS) आणि पंचेंद्रिय, तसेच अॅनेकोइक टाइल्समुळे या पाणबुडीची गुप्तता आणि शोध क्षमता वाढते.
Tomorrow, 03 April, I shall be in Visakhapatnam to attend the Commissioning Ceremony of the advanced stealth Frigate ‘Taragiri’.
This commissioning highlights the strategic and maritime importance of India’s eastern seaboard as well as the Indian Navy’s sustained focus on… pic.twitter.com/rOSxZ9Ftuz — Rajnath Singh (@rajnathsingh) April 2, 2026
संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते आज आयएनएस तारागिरी स्टेल्थ फ्रिगेटचेही जलावतरण होणार आहे. याप्रसंगी गोदीचे (डॉकमधील) वरिष्ठ अधिकारी तसेच अनेक नौदल अधिकारी उपस्थित असतील.
प्रोजेक्ट १७ ए अंतर्गत विकसित करण्यात आलेली तारागिरी ही चौथी स्टेल्थ फ्रिगेट आहे. ही मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधलेली ६,६७० टन वजनाची युद्धनौका आहे. तिच्या रचनेमुळे ती रडारला चकवू शकते. या क्षमतेमुळे दीर्घकाळ ही फ्रिगेट समुद्रातील कठीण परिस्थितीतही सुरक्षित राहू शकते. ही नौका ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीने बांधली आहे. आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या या फ्रिगेटमध्ये सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहेत. समुद्रातून समुद्रात तसेच समुद्रातून आकाशात आणि समुद्रातून जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता या फ्रिगेटमध्ये आहे.






