Friday, April 3, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील सुरू असलेली खोदकामे,अपूर्ण कामे,खड्डे तसेच अपुऱ्या निचऱ्यामुळे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिक,वाहनचालक व पादचारी यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी तातडीने या परिस्थितीची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाला सर्वसमावेशक आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. महापौरांनी स्पष्ट केले की,अशा प्रकारच्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तात्काळ,मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन स्तरांवर नियोजनबद्ध उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. शहरातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविणे व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. सुरू असलेली सर्व खोदकामे सुरक्षितरीत्या बंदिस्त करून रस्ते पूर्वस्थितीत आणण्यावर भर दिला जाणार आहे. साचलेले पाणी तातडीने काढण्यासाठी पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल तसेच प्रमुख चौक,पुल,अंडरपास व सखल भागात विशेष पथके नियुक्त करून सतत देखरेख ठेवली जाईल. नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद मिळावा यासाठी २४x७ नियंत्रण कक्ष अधिक सक्षम केला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व गटार स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जातील. वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करून त्या ठिकाणी स्वतंत्र निचरा आराखडा तयार केला जाईल. विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन केली जाणार असून रोड कटिंग परवानग्यांवर कडक अंमलबजावणी केली जाईल. तसेच रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी तृतीय पक्ष तपासणी यंत्रणा लागू केली जाणार आहे. दीर्घकालीन उपाययोजना : शहरासाठी एकात्मिक पर्जन्यजल व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूरस्थितीचे रिअल-टाइम मॉनिटरिंग सुरू करण्यात येणार आहे. अंडरग्राउंड युटिलिटी डक्ट प्रणाली विकसित करून वारंवार होणारी खोदकामे टाळली जातील तसेच सखल भागांमध्ये कायमस्वरूपी पंपिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येईल. यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती मोहिम राबवून नाल्यात कचरा टाकण्याचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा